माविम प्रांगण येथे प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग योजना प्रशिक्षण

माविम प्रांगण येथे प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग योजना प्रशिक्षण

भंडारा, दि. 14 : जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय, भंडारा व महिला आर्थिक विकास महामंडळ, भंडारा यांच्या संयुक्त विद्यमाने 14 ते 16 जून असे तीन दिवसीय प्रशिक्षण प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग योजना प्रशिक्षण आयोजित करण्यात आले असून आजपासून प्रशिक्षणाला सुरूवात झाली. यावेळी मंचावर जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अरुण बलसाने, प्रशिक्षक विजय भैस, माविमचे जिल्हा समन्वय अधिकारी प्रदीप काठोळे, प्रशिक्षक गौतम कांबळे, प्रशिक्षक भौदिप शहारे उपस्थित होते.

प्रशिक्षणाच्या सुरुवातीला क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण करून दिपप्रज्वलन करण्यात आले. याप्रसंगी प्रशिक्षणार्थी यांना जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अरुण बलसाने यांनी उद्योग करण्यासंदर्भात प्रस्ताव कसे सादर करावे, याविषयी सविस्तर माहिती प्रशिक्षणातून दिली जाईल, असे आश्वासन दिले. माविमचे जिल्हा समन्वय अधिकारी प्रदीप काठोळे यांनी प्रशिक्षणार्थी यांना उद्योग सुरू करण्यापूर्वी उद्योगाचे ज्ञान अवगत करून घेणे महत्त्वाचे आहे, असे मत व्यक्त केले. प्रशिक्षणार्थी यांनी स्वतःचा परिचय करून देत सुरू करणार असल्याच्या उद्योगाबाबत माहिती दिली. संचालन माविमचे सहायक जिल्हा समन्वय अधिकारी मोहन घनोटे यांनी केले.