जिल्हाधिका-यांच्या अध्यक्षतेखाली सैनिक मंडळाची बैठक

जिल्हाधिका-यांच्या अध्यक्षतेखाली सैनिक मंडळाची बैठक

चंद्रपूर, दि. 7 जून : जिल्हा सैनिक मंडळाची स्थापना शासनाच्या निर्देशाप्रमाणे 25 एप्रिल 2022 रोजी जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या मान्यतेने तसेच जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांच्या आदेशान्वये करण्यात आली आहे. या मंडळाची बैठक आज (दि.7) जिल्हाधिकारी कार्यालयात घेण्यात आली. यावेळी जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी तथा निवृत्त कॅप्टन दीपक लिमसे, अशासकीय सदस्य ॲड भास्कर लाडे, विजय साखरकर, जनार्दन नागपूरे, प्रज्योत नळे आणि अरुण मालेकर उपस्थित होते.

बैठकीत आजी माजी सैनिकांच्या विविध योजना व त्यांच्या प्रगतीचा आढावा घेणे, सैनिक विश्रामगृह, सैनिकी मुला-मुलींचे वसतीगृह निर्माण करणे, चंद्रपूर येथे ईसीएचएस सुविधा, कॅन्टीन सुविधा मिळणे, घरटॅक्स माफीसाठी माजी सैनिक / विधवांना अवगत करणे, शहीद सैनिकांच्या जमिनीबाबतची प्रकरणे निकाली काढण्याबाबत उपाययोजना करणे, राज्य शासनाच्या विविध उपक्रमात माजी सैनिकांना प्रोत्साहित करणे, माजी सैनिकांच्या विधवांचे निवृत्ती वेतनाची प्रकरणे निकाली काढणे, आजी – माजी सैनिक / विधवा / अवलंबित यांच्यावर होणा-या अन्यायाबाबत तात्काळ कार्यवाही करणे, सैन्यदलात भरतीसाठी तरुणांना प्रोत्साहित करणे व भरतीसाठी पोषक वातावारण तयार करणे आदी विषयांवर चर्चा करण्यात आली.

जिल्ह्यात सैनिक विश्रामगृहासाठी 81 चौ. मीटर जागा उपलब्ध असून आतापर्यंत घरटॅक्स माफीचे 347 जणांना प्रमाणपत्र वाटप तर माजी सैनिकांच्या विधवांची निवृत्ती वेतनाची सर्व 11 प्रकरणे निकाली काढण्यात आल्याचे जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी श्री. लिमसे यांनी सांगितले.