विद्यार्थ्यांना तंत्रज्ञान आणि उद्योजकतेच्या प्रशिक्षणासाठी सामंजस्य करार विद्यार्थ्यांमध्ये जीवनकौशल्ये विकसित करणारे अभ्यासक्रम आवश्यक – उपमुख्यमंत्री अजित पवार

विद्यार्थ्यांना तंत्रज्ञान आणि उद्योजकतेच्या प्रशिक्षणासाठी सामंजस्य करार

विद्यार्थ्यांमध्ये जीवनकौशल्ये विकसित करणारे अभ्यासक्रम आवश्यक – उपमुख्यमंत्री अजित पवार

           मुंबईदि. :– शिक्षण पद्धतीमध्ये बदल करून आता जीवनकौशल्ये विकसित करणारे अभ्यासक्रम आवश्यक आहेत. या अनुषंगाने विद्यार्थ्यांचे अंगभूत गुण आणि कौशल्य ओळखून त्यामध्ये त्यांना पारंगत करणारे जगातील सर्वोत्तम शिक्षण देण्याचा प्रयत्न करावा. यासाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नाहीअशी ग्वाही उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांनी दिली.

 

विद्यार्थ्यांना तंत्रज्ञानातील बदलजागतिकीकरणातील अनिश्चितता यांना आत्मविश्वासाने सामोरे जाता यावे यासाठी शालेय शिक्षण विभागाच्या वतीने महाराष्ट्र यंग लिडर्स अस्पीरेशन डेव्हलपमेंट प्रोग्राम’ (MYLAP- मिलाप) ची सुरूवात होत आहे. याअनुषंगाने एचसीएल’ तसेच ईएन पॉवर’ यांच्यासमवेत आज दोन सामंजस्य करारांचे हस्तांतरण करण्यात आले. त्यावेळी उपमुख्यमंत्री श्री.पवार बोलत होते. महसूलमंत्री बाळासाहेब थोरातशालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाडमुंबई जिल्ह्याचे पालकमंत्री अस्लम शेखखासदार अरविंद सावंतस्थानिक आमदार राहूल नार्वेकरशिक्षण विभागाचे सचिव रणजितसिंह देओलसमग्र शिक्षा अभियानाचे राज्य प्रकल्प संचालक कैलास पगारेशिक्षण आयुक्त सुरज मांढरे आदींसह एचसीएल आणि ईएन पॉवर कंपन्यांचे वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री श्री.पवार म्हणालेविद्यार्थ्यांमध्ये पुस्तकी ज्ञानाबरोबरच तंत्रज्ञानावर भर देऊन कौशल्य विकासजगाला सामोरे जाण्याचे धैर्य आणि आत्मविश्वास निर्माण होणे आवश्यक आहे. यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य समजून घेणे गरजेचे असून शिवराज्याभिषेक दिनी हे करार होणे हा चांगला योग आहे. प्रा.वर्षा गायकवाड यांनी हा योग साधून आजच्या दिवशी या कार्याचा शुभारंभ केल्याबद्दल त्यांचे कौतुक करून स्पर्धेच्या युगात टिकून विद्यार्थ्यांचे भवितव्य उज्ज्वल होण्यासाठी हे करार महत्त्वपूर्ण असल्याचे श्री.पवार म्हणाले. येथेच न थांबता अभ्यासक्रमाचा आशय आणि विषय बदलून बदलांसोबत जुळवून घेणारे तसेच उद्योजकतेची मानसिकता निर्माण करणारे शिक्षण द्यावेअशी सूचना त्यांनी केली.

तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शेवटच्या विद्यार्थ्यापर्यंत पोहोचावे- बाळासाहेब थोरात

            बुद्धीमत्ता ही कुठेही असू शकतेहे अनेकदा सिद्ध झाले आहे. यामुळे तंत्रज्ञानाच्या माध्यमातून ग्रामीण भागात वाडी-वस्त्यांवरील विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचून सर्व विद्यार्थ्यांना प्रशिक्षण द्यावेअशी अपेक्षा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केली. कोविडच्या प्रादूर्भावामुळे प्रत्यक्ष शिक्षणावर मर्यादा आल्या होत्या. आता दोन्ही करारांच्या माध्यमातून शिक्षण विभाग नवी झेप घेण्यासाठी सज्ज झाला असल्याचे त्यांनी सांगितले. बदलत्या काळानुसार शिक्षण व्यवस्था बदलली पाहिजे आणि विद्यार्थी आव्हानांना सामोरे जाण्यासाठी सक्षम झाला पाहिजेयासाठी प्रा.वर्षा गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली शिक्षण विभाग करीत असलेल्या प्रयत्नांचे त्यांनी कौतुक केले.

विद्यार्थी हे राष्ट्राचे भवितव्य – प्रा.वर्षा गायकवाड

आपला देश तरूणांचा देश आहे. विद्यार्थी हे राष्ट्राचे भवितव्य तर आजचे अस्तित्व आहेत. त्यांना तंत्रज्ञान आणि उद्योजकतेबाबत प्रशिक्षण देण्याच्या उद्देशाने आज एचसीएल आणि ईएन पॉवर यांच्यासमवेत सामंजस्य कराराचे हस्तांतरण करण्यात आले आहे. यापुढे इतरही सर्व क्षेत्रांमध्ये प्रशिक्षणाची संधी उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे शालेय शिक्षण मंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांनी सांगितले.

प्रा.गायकवाड म्हणाल्याया सामंजस्य कराराच्या माध्यमातून विभागाने क्रांतीकारी पाऊल टाकले आहे. विद्यार्थी तंत्रज्ञानकौशल्य विकास यात कुठेही मागे राहणार नाही यासाठी एचसीएल टेक्नॉलॉजी या जागतिक दर्जाच्या कंपनीमार्फत गणित विषयात 60 गुणांसह 12 वी विज्ञान शाखेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना एक वर्षाचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. सहा महिन्यानंतर त्यांना लाईव्ह प्रोजेक्टवर काम करण्याची देखील संधी मिळणार असून दरमहा मानधन देखील दिले जाणार आहे. यामुळे सुमारे 20 ते 25 हजार विद्यार्थ्यांना याचा लाभ होऊन 12 वी नंतर आयटी प्रोफेशनल बनण्याची संधी मिळणार आहे. यासाठी आजपासून नोंदणी सुरू करण्यात आली असून विद्यार्थ्यांनी याचा लाभ घेण्याचे आवाहन त्यांनी केले.

शिक्षण मंत्री प्रा.गायकवाड म्हणाल्यास्वजीवी महाराष्ट्र या उपक्रमांतर्गत राज्यातील 488 आदर्श शाळांमधील सहावी ते नववी च्या विद्यार्थ्यांमध्ये उद्योजकतेची मानसिकता घडविणारा अभिनव प्रकल्प सुरू होत आहे. स्वजीवी म्हणजे स्वप्नजिद्द आणि विश्वास या त्रिवेणीच्या माध्यमातून आत्मनिर्भर बनण्याचा तसेच नोकरीच्या संधी कमी होत असलेल्या काळात विद्यार्थ्यांना स्वयंरोजगारासाठी तयार करणारा प्रकल्प आहे. भविष्यात टप्प्याटप्प्याने इतरही शाळांमध्ये हा प्रकल्प राबविण्याचे नियोजन असून विद्यार्थ्यांना इतरही उपयुक्त प्रशिक्षण उपलब्ध व्हावे यादृष्टीने विविध राज्ये आणि देशांसमवेत चर्चा सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

शिक्षणाला पर्याय नाही- अस्लम शेख

            मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी ज्ञान हे सर्वश्रेष्ठ असून शिक्षणाला पर्याय नसल्याचे सांगितले. जगात सध्या संधींबरोबरच आव्हाने देखील आहेत. या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी नवनवीन उपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिले जात आहेयाबद्दल शालेय शिक्षण विभागाचे अभिनंदन केले.

प्रारंभी राज्य प्रकल्प संचालक श्री.पगारे यांनी प्रास्ताविकाद्वारे एचसीएल सोबत होत असलेल्या कराराची तर शालेय शिक्षण आयुक्त सुरज मांढरे यांनी ईएन पॉवर समवेत होत असलेल्या कराराबाबतची माहिती दिली. एचसीएलच्या वतीने सुब्बारमण यांनी तर ईएन पॉवरच्या वतीने सुशील मुणगेकर यांनी कराराचे हस्तांतरण केले.

यावेळी उपस्थित मान्यवरांनी उपग्रहाच्या साहाय्याने 35 जिल्ह्यांमध्ये जोडण्यात आलेल्या शाळांमधून अमरावतीच्या शाळेतील विद्यार्थ्यांशी संवाद साधला.