जिल्ह्यात पांदणरस्ते बांधकामाचे पालकमंत्र्यांच्या हस्ते भुमिपूजन

जिल्ह्यात पांदणरस्ते बांधकामाचे पालकमंत्र्यांच्या हस्ते भुमिपूजन

Ø  सावली तालुक्यातील हरंबा येथून सुरवात

चंद्रपूर दि. 2 जून : गावागावातील पांदण रस्ते हा शेतक-यांचा अतिशय जिव्हाळ्याचा विषय असून एकप्रकारे त्या ग्रामीण भागातील रक्तवाहिन्या समजल्या जातात. शेतापर्यंत शेतमालाची ने-आण करणे, बैलजोडी, ट्रॅक्ट, मजूर थेट शेतापर्यंत घेऊन जाणे आदींसाठी पांदण महत्वाची ठरते. या पार्श्वभुमीवर राज्याचे मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या हस्ते मातोश्री ग्रामसमृध्दी योजनेंतर्गत सावली तालुक्यातील हरंबा येथे पांदण रस्त्याच्या बांधकामाचे भुमिपूजन करण्यात आले.

यावेळी सा.बा. उपविभाग नागभीडचे कार्यकारी अभियंता हेमंत कोठारी, सावलीचे तहसीलदार परिक्षित पाटील, गटविकास अधिकारी सुनिता मरसकोल्हे, दिनेश चिटनुरवार, नितीन गोहणे, हरंबाचे सरपंच आश्विनी बोदलकर, उपसरपंच प्रवीण संतोषवार आदी उपस्थित होते.

हरंबा येथे 24 लक्ष 60 हजार रुपये खर्च करून पांदण रस्त्याचे खडीकरण व मजबुतीकरण करण्यात येणार आहे, असे सांगून पालकमंत्री श्री. वडेट्टीवार म्हणाले, शेतक-यांच्या दृष्टीने हा अतिशय महत्वाचा विषय आहे. शेतात जाण्याकरीता पांदण रस्ता नसला की, शेतक-यांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. चिखल तुडवत त्याला शेतापर्यंत पोहचावे लागते. त्यामुळे राज्य शासनाने चंद्रपूर जिल्ह्यातील मातोश्री ग्रामसमृध्दी शेतपाणंद रस्त्याच्या कामाचा 2022 – 23 या आर्थिक वर्षाकरीता आराखड्यामध्ये समावेश केला आहे. हरंबा येथून पांदन रस्त्याच्या बांधकामाचा शुभारंभ झाला असून लवकरात लवकर या पांदण रस्त्यांचे बांधकाम पूर्ण करण्याच्या सुचना संबंधित विभागाला आपण दिल्या आहेत, असे त्यांनी सांगितले.