3600 शेतकरी मिळून पाच उत्पादक कंपन्यांची स्थापना Ø शेतकरी उत्पादित मालविक्री केंद्राचे उद्घाटन

शेतक-यांच्या उत्पादित मालाच्या विक्रीसाठी जागा व निधी देणार  – पालकमंत्री विजय वडेट्टीवार

Ø 3600 शेतकरी मिळून पाच उत्पादक कंपन्यांची स्थापना

Ø शेतकरी उत्पादित मालविक्री केंद्राचे उद्घाटन

चंद्रपूर दि. 3 जून : कोरोनाच्या महामारीनंतर आरोग्याच्या आणि खाण्या – पिण्याच्या सवयींबाबत जगात संशोधन सुरू आहे. सद्यस्थितीत रासायनिक व भेसळयुक्त पदार्थ खात असल्यामुळे विविध आजारांना आपणच निमंत्रण देत आहोत. अशा परिस्थितीत   शेतक-यांनी सेंद्रीय पध्दतीने उगविलेले अन्नधान्य खाण्याकडे नागरिकांचा कल वाढत आहे. याच उद्देशाने सेंद्रीय पध्दतीने शेती करून 3600 शेतक-यांनी एकत्र येऊन पाच उत्पादक कंपन्यांची स्थापना केली आहे. हा चंद्रपूर जिल्ह्यातील एक अभिनव उपक्रम असून शेतक-यांच्या उत्पादित मालाच्या विक्रीसाठी जागा आणि निधी उपलब्ध करून देऊ, अशी ग्वाही जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली.

तुकूम येथे शेतकरी उत्पादित मालविक्री केंद्राचे उद्घाटन करतांना ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी भाऊसाहेब ब-हाटे, नाबार्डचे व्यवस्थापक तृणाल फुलझेले, प्रकाश देवतळे, नम्रता ठेमस्कर आदी उपस्थित होते.

शेतक-यांनी पिकविलेल्या शेतमालाला योग्य बाजारभाव मिळावा, या उद्देशाने 3600 शेतकरी सभासदांनी उत्पादक कंपन्यांची स्थापना केली आहे, असे सांगून पालकमंत्री श्री. वडेट्टीवार म्हणाले, शेतक-यांच्या श्रमाला प्रतिष्ठा मिळणे, संघटीतरित्या त्यांनी एकत्र येणे आजच्या काळाची गरज आहे. सद्यस्थितीत आपण भेसळयुक्त खात आहोत, शेतक-यांनी सेंद्रीय पध्दतीने तयार केलेला माल स्वत:च विकला तर त्याचा अधिक फायदा शेतक-यांना होईल.

शेती क्षेत्रात मोठमोठ्या कंपन्या उतरत आहेत. शेतमालावर आपणच प्रक्रिया केली तर भविष्यात एक मोठे काम उभे राहील. त्यासाठी जिल्ह्यात शेतक-यांनी उत्पादित केलेल्या मालाच्या विक्रीसाठी एक मॉल किंवा जागा उपलब्ध करून देऊ. याबाबत जिल्हा प्रशासनाने विशेष लक्ष द्यावे. कॅन्सर व इतर रोगांची उत्पत्ती कशी होते हे आपणच लोकांच्या गळी उतरविणे आवश्यक आहे. लोकांपर्यंत जाऊन आपला माल विक्री करा, असे आवाहन पालकमंत्र्यांनी केले.

यावेळी जिल्हाधिकारी श्री. गुल्हाने म्हणाले, पाच कंपन्यांच्या निर्मितीने एक चांगली सुरवात केली आहे. बदलत्या जगात मार्केटिंगची पध्दत बदलावी लागेल. केवळ दुकान उघडून बसू नये. तर विक्रीकरीता लोकांच्या दारापर्यंत पोहचणे गरजेचे आहे, असे त्यांनी सांगितले.

अशा आहेत पाच उत्पादक कंपन्या : या पाचही शेतकरी उत्पादक कंपन्या सावली तालुक्यातील असून यात चंद्रपूर – गडचिरोली फार्मर्स प्रोड्यूसर कंपनी (शेतकरी सभासद 1200), नास शेतकरी उत्पादक कंपनी मर्या (600), व्याहाड शेतकरी उत्पादक कंपनी (500), गेवरा शेतकरी उत्पादक कंपनी (700) आणि आसोलामेंढा शेतकरी उत्पादक कंपनी (600 सभासद) समावेश आहे. या कपंन्यामार्फत सेंद्रीय पध्दतीने पिकविलेला काळा, पिवळा व हिरवा तांदूह, मिरची पावडर, धने, हळद पावडर, तीळ, तूप, तूर – चना – मूग डाळ, हरभरा व इतर उत्पादने आहेत. या कपंन्यासाठी नाबार्डचे सहकार्य मिळाले असून स्मार्ट प्रकल्पांतर्गत शासनाकडे प्रस्ताव सादर करण्यात आला आहे.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक चंद्रपूर – गडचिरोली फार्मर्स प्रोड्यूसर कंपनीचे प्रमुख चेतन रामटेके यांनी केले. संचालन विजय कोरेवार यांनी तर आभार गेवरा शेतकरी उत्पादक कंपनीचे प्रमुख दिलीप फुलबांधे यांनी केले. कार्यक्रमाला व्याहाड शेतकरी उत्पादक कंपनीचे प्रमुख राकेश पेटकर, नास कंपनीचे रामवीर सिंग, आसोलामेंढा शेतकरी उत्पादक कंपनीचे आशिष पुण्यपवार यांच्यासह राजू सिद्दम, विनायक डांगे, कृषी उपसंचालक रविंद्र मनोहरे, कृषी विकास अधिकारी लक्ष्मीनारायण दोडके, सावलीच्या तालुका कृषी अधिकारी आश्विनी गोडसे व शेतकरी उपस्थित होते.