राष्ट्रीयकृत बँकांनी पीक कर्जवाटपाची गती वाढवावी – पालकमंत्री विजय वडेट्टीवार

राष्ट्रीयकृत बँकांनी पीक कर्जवाटपाची गती वाढवावी – पालकमंत्री विजय वडेट्टीवार

Ø जून अखेरपर्यंत 50 टक्के वाटप करण्याचे निर्देश

चंद्रपूर दि. 18 जून : खरीप हा शेतक-यांसाठी अतिशय महत्वाचा हंगाम असून त्याचा संपूर्ण वर्षाचा डोलारा यावरच अवलंबून असतो. शेतक-याला आजच्या घडीला पीक कर्जाची आवश्यकता आहे. त्यामुळे राष्ट्रीयकृत बँकांनी कर्जवाटपाची गती वाढवून शेतक-याला दिलासा द्यावा. तसेच जून अखेरपर्यंत या बँकांनी 50 टक्के कर्जवाटपाचे उद्दिष्ट पूर्ण करावे, असे निर्देश मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन मंत्री तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात कर्ज वाटपाचा आढावा घेतांना ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, अतिरिक्त जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर, निवासी उपजिल्हाधिकारी मनोहर गव्हाड, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी भाऊसाहेब ब-हाटे, कृषी विकास अधिकारी शंकर किरवे यांच्यासह बँकांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

काही राष्ट्रीयकृत बँकांची कर्जवाटपाची गती अतिशय संथ आहे, असे सांगून पालकमंत्री श्री. वडेट्टीवार म्हणाले, जिल्ह्यात जवळपास पावणेतीन लाख पात्र शेतकरी आहेत. तसेच खरीपमध्ये 850 कोटींचे कर्जवाटपाचे जिल्ह्याला उद्दिष्ट आहे. सभासद शेतक-यांची मागणी असेल तर बँकांनी त्वरीत कर्जवाटप करावे. शेतक-यांचे सर्व काही कर्जावरच अवलंबून असते. त्यामुळे या महिन्याअखेर राष्ट्रीयकृत बँकांचे उद्दिष्ट 50 टक्क्यांपर्यंत झाले पाहिजे, अशा सुचना त्यांनी केल्या.

सद्यस्थितीत जिल्ह्यात सर्व बँकामिळून 63798 शेतक-यांना 503 कोटी 26 लाख रुपयांचे कर्जवाटप झाले आहे. ही आकडेवारी 59.21 आहे. यात चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने 55065 शेतक-यांना 418.79 कोटी (90.45 टक्के), ग्रामीण बँकेने 2777 शेतक-यांना 29.24 कोटी (37.61 टक्के), तर राष्ट्रीयकृत बँकेने 5956 शेतक-यांना 55.21 (18 टक्के) कोटींचे कर्जवाटप केले आहे.

सिंदेवाही व सावली तालुक्यातील प्रस्तावित रस्त्यासंदर्भात आढावा : एडीबी बँकेतर्फे सिंदेवाही व सावली तालुक्यातील प्रस्तावित रस्त्यासंदर्भात पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी आढावा घेतला. यात सिंदेवाही ते पाथरी हा 20 किमीचा रस्ता (वन विभागाच्या जागेवरील लांबी 13.87 किमी), आणि हिरापूर ते बोथली हा 13.32 किमीचा रस्त्याचा (वन विभागाच्या जागेवरील लांबी 4.25 किमी) समावेश आहे. या रस्त्यामुळे तीन तालुके जोडले जाणार असल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले.

यावेळी ब्रम्हपूरी वनविभागाचे उपवनसंरक्षक दिपेश मल्होत्रा, सिंदेवाहीचे उपविभागीय अधिकारी प्रकाश संकपाळ, नायब तहसीलदार सचिन पाटील, सा.बा. विभागाचे कार्यकारी अभियंता हेमंत कोठारी, उपवनअधिकारी सारीका जगताप आदी उपस्थित होते. घुग्गुस न.प. कामांचा आढावा : घुग्गुस नगर परिषदेच्या कामासंदर्भात पालकमंत्री श्री. वडेट्टीवार यांनी आढावा घेऊन पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, दलितवस्ती सुधार कार्यक्रम, प्रस्तावित रस्ते, नाल्या आदींची कामे प्राधान्याने करण्याच्या सुचना दिल्या.