रेबीज म्हणजे काय?

रेबीज म्हणजे काय?

 

भंडारा, दि. 19 मे : प्राण्यांनी चावल्यामुळे पसरणारा ‘रेबीज’ हा एक व्हायरस म्हणजे विषाणूजन्य आजार आहे. रेबीजचा व्हायरस रुग्णाच्या शरीरात शिरल्यानंतर सेंट्रल नर्व्हस सिस्टमवर, म्हणजेच मज्जासंस्थेवर हल्ला करतो. यामुळे रुग्णाच्या डोक्यात आणि मणक्यात सूज येते. रेबीज व्हायरस रुग्णाच्या डोक्यात शिरला तर रुग्ण कोमात जाऊ शकतो किंवा मृत्यू होऊ शकतो. काही रुग्णांमध्ये पॅरालिसिसची (लकवा) समस्या निर्माण होते. काहीवेळा रुग्णांच्या व्यवहारात अचानक बदल होतो आणि रुग्ण अधिक हायपर झालेले दिसून येतात. माणसाच्या शरीरात प्रवेश केल्यानंतर रेबीज व्हायरस अत्यंत वेगाने पसरण्यास सुरूवात होते. एकदा रेबीजचं निदान झालं तर या आजारावर कोणताही ठोस उपाय नाही. त्यामुळे प्राणी चावल्यानंतर प्रतिबंधात्मक उपाय सर्वांत महत्त्वाचे आहेत.

 

रेबीज प्रामुख्याने जंगली प्राण्यांमध्ये पण काही प्रमाणात घरातील पाळीव प्राण्यांमध्येही आढळून येतो. रेबीजचा संसर्ग झालेल्या प्राण्यांच्या लाळेतून हा आजार पसरतो. प्राण्यांनी चावल्यामुळे, अंगावर ओरखडे मारल्यामुळे, माणसांच्या अंगावरची उघडी जखम चाटल्यामुळे प्राण्यांच्या लाळेतून रेबीजचा विषाणू मानवी शरीरात प्रवेश करतो.

 

रेबीजची लक्षणं काहीवेळा फार उशीराने लक्षात येतात तोपर्यंत उपचार कठीण होण्याची शक्यता असते. सामान्यत: आजाराची लक्षणं 2-3 महिन्यातही दिसून येतात. ताप आणि अंगदुखी होणे, व्हायरस सेंट्रल नर्व्हस सिस्टिममध्ये (चेतासंस्थेत) शिरल्यानंतर मेंदू आणि मणक्यात सूज येणं, फ्युरिअस रेबीजमध्ये रुग्णाचं वागणं बदलते, रुग्ण हायपर होतो किंवा त्यांना पाण्याची भीती वाटू लागते, हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने मृत्यू होणे, पॅरेलॅटीक रेबीजमध्ये स्नायू हळूहळू कमकूवत होणे, रुग्ण कोमात जातो आणि त्यानंतर मृत्यू होतो.

 

रेबीज व्हायरस प्राण्यांच्या लाळेतून माणसाच्या शरीरात प्रवेश करतो. त्यामुळे प्राणी चावल्यानंतर जखमेची जागा स्वच्छ करणं सर्वांत महत्त्वाचं आहे. प्राण्याने चावल्यानंतर जखमेवर योग्य उपचार अत्यंत महत्त्वाचे आहेत. त्यामुळे संसर्ग शरीरातील इतर भागात पसरण्यावर नियंत्रण मिळवता येते. प्राणी चावल्यामुळे जखम झालेल्या जागेवरची लाळ लवकरात लवकर स्वच्छ करावी. पाणी आणि साबणाने जखमेचा भाग 15 मिनिटं स्वच्छ धूवावा. जखम धुवून झाल्यानंतर त्यावर अॅन्टिसेप्टिक लावावे. साबण किंवा व्हायरसविरोधी पदार्थ (अल्कोहोल, प्रोव्हिडोन आयोडिन) उपलब्ध नसेल तर जखम पाण्याने धूवावी. जखमेत संसर्ग होऊ नये यासाठी टीटॅनसचं इंजेक्शन घ्यावे. तात्काळ डॉक्टर किंवा रुग्णालयात जाऊन वैद्यकीय मदत घ्यावी. प्राणी चावल्यानंतर साध्या हातांनी जखमेला स्पर्श करू नये, स्पर्श करण्याआधी हात स्वच्छ करावे. जखमेवर माती, तेल, लिंबू, खडू, मिरची पावडर यांसारखे पदार्थ लावून जखमेवर पट्टी बांधू नये.

 

रेबीजविरोधी लस कशी देण्यात येते?

 

रेबीज प्रतिबंधासाठी रेबीजविरोधी लशीचे पाच डोस घ्यावे लागतात. प्राणी चावल्यानंतर त्याच दिवशी लस घ्यावी लागते. याला शून्य दिवस असं म्हटलं जातं. त्यानंतर तीन, सात, 14 आणि 28 व्या दिवशी रेबीजविरोधी लस घ्यावी लागते.

 

रेबीजची लस कोणाला दिली जाते?

 

घरातील कुत्रा, मांजर यांसारख्या पाळीव प्राण्यांना रेबीजविरोधी लस दिली जाते. त्याचसोबत पशूवैद्यकीय अधिकारी, डॉक्टर, कर्मचारी आणि प्राण्यांसोबत काम करणाऱ्यांना प्रतिबंधात्मक उपाय म्हणून दिली जाते.

 

रेबीज झालेल्या प्राण्यांचं काय केलं जातं?

 

एखाद्या प्राण्याला रेबीज असल्याचा संशय आला तर त्यांना मॉनिटर केलं जातं. या प्राण्यांना सरकारी रुग्णालयात किंवा प्राण्यांसाठी काम करणाऱ्या सामाजिक संस्थांच्या आयसोलेशन वॉर्डमध्ये वेगळं ठेवलं जातं. प्राण्यांना रेबीज होऊ नये यासाठी त्यांचं नियमित लसीकरण महत्त्वाचं आहे. प्राण्यांना पहिल्या वर्षी रेबीजविरोधी लशीचे दोन डोस दिले जातात, त्यानंतर दरवर्षी एक डोस दिला जातो.