जिल्हयात मान्सुन पूर्व तयारीला सुरूवात

जिल्हयात मान्सुन पूर्व तयारीला सुरूवात

जिल्हास्तरावर तालुकास्तरीय यंत्रणेबरोबर नियोजन बैठक संपन्न

 

गडचिरोली, दि.14 : गडचिरोली जिल्हयात दरवर्षी पावसामुळे मोठ्या प्रमाणात पुर येत असतो. याबाबत आवश्यक तयारी म्हणून जिल्हा प्रशासनाकडून तहसीलदार व गट विकास अधिकारी यांची मान्सून पूर्व तयारीबाबत बैठक घेण्यात आली. या बैठकीला धनाजी पाटील, प्र.जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, गडचिरोली, कुमार आशिर्वाद, मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प. गडचिरोली, समाधान शेंडगे, निवासी उपजिल्हाधिकारी, मैनक घोष, उपविभागीय अधिकारी, शुभम गुप्ता, उपविभागीय अधिकारी, एटापल्ली, अंकीत, उपविभागीय अधिकारी, अहेरी, राजेन्द्र भुयार,अ.मु.का.अ.जि.प., पुनम पाटे, उपवनसरंक्षक, सिरोंचा वनविभाग, दर्शन निकाळजे, जिल्हा पुरवठा अधिकारी, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी निलेश तेलतुंबडे उपस्थित होते.

 

मान्सुन पूर्व कालावधीमध्ये तालुका स्तरावर तहसीलदार तसेच संवर्ग विकास अधिकारी यांना स्थानिक पथकांची स्थापना करुन त्यामध्ये सर्व लाईन डीपार्टमेंटचे अधिकारी व कर्मचारी यांचा समावेश करावा अशा सूचना दिल्या आहेत. स्थानिक पथकांची भूमिका पूरस्थितीत महत्त्वाची राहणार आहे. तसेच सदर स्थानिक पथकामार्फत तालुक्यातील पूरप्रवण गावातील तसेच संपर्क तुटणारे गावातील आश्रयस्थान ज्यामध्ये आश्रमशाळा, शाळा, महाविद्यालय, समाज मंदीर, इत्यादी निश्चित करुन तपासणी करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

 

विद्युत व्यवस्था, पिण्याचे पाणी, सुरक्षेसंबधी खातरजमा, मदत मिळण्याकरीता लागणारे संसाधन,ज्यामध्ये पिण्याचे पाणी, फुड पॅकेटस, लहान बोटी, राशन इत्यादी ची व्यवस्था आधीच करुन ठेवण्यात यावी अशा सूचनाही देण्यात आल्या.

 

सर्व तहसिलदार तसेच सवंर्ग विकास अधिकारी त्यांचे स्तरावर तालुक्यातील सर्व पूरवठाधारकांची याबाबत बैठक घेणार आहेत. पावसाळयात सोसाटयाच्या वादळामुळे तसेच अतिवृष्टीमुळे रस्त्याच्या कडेला असलेली तसेच गावातील संभाव्य धोकादायक झाडे पडण्याची शक्यता लक्षात घेता वनविभाग या बाबचता सर्व्हे करणार आहे. 1 जुन 2023 पासुन तालुका स्तरावर सर्व विभागांकडून नियंत्रण कक्ष सुरु करण्यात येणार आहेत.

 

कोणतीही जीवीतहानी होवू नये, गरोदर मातांना योग्य स्थळी उपचार देणे, गावस्तरावरील आवश्यक औषध पुरवठा, शेतीविषयक बिबीयाणे खते, आवश्यक राशन अशा साहित्यांबाबत व सेवांबाबत प्रशासनाकडून नियोजन केले जात आहे. या बैठकीत आपत्ती व्यवस्थापन सल्लागार कृष्णा रेड्डी यांनी नियोजनाबाबत सादरीकरण केले.