नगर परिषद पवनी अंतर्गत विविध विकास कामांचे भुमिपूजन संपन्न

नगर परिषद पवनी अंतर्गत विविध विकास कामांचे भुमिपूजन संपन्न

 

भंडारा, दि. 9 : नगर परिषद पवनी, जिल्हा-भंडारा अंतर्गत विविध योजने अंतर्गत शहरातील विविध विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळा आज नगर परिषद क्षेत्रात विविध ठिकाणी घेण्यात आला. त्यामध्ये महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाभियान अंतर्गत पवनी भुयारी गटार मलनिस्सारण प्रकल्पाचे तसेच बालसमुद्र तलावाचे सौंदर्यीकरण व पुनरुज्जीवन करणे या कामाचे तसेच विशेष रस्ता अनुदान अंतर्गत रु. ८.७५ कोटींच्या रस्ते बांधकाम करणे, नागरी सुविधा सहाय्य योजना अंतर्गत रु. ७.७० कोटी किंमतीच्या कामांचे भूमिपूजन तसेच शहरातील विद्यार्थी व युवक/युवतींना स्पर्धा परीक्षा क्षेत्रात उज्ज्वल भविष्य घडविण्याकरिता उत्तम वातावरण व संसाधने मिळवून देण्याच्या दृष्टीकोनातून तयार केलेल्या सर्व सोयी सुविधांनी सुसज्ज ई-लायब्ररी व अभ्यासिकेचा लोकार्पण सोहळा खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, भंडारा-पवनी विधानसभा क्षेत्राचे आमदार नरेंद्र भोंडेकर, जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर, मुख्याधिकारी तथा प्रशासक, मुख्य कार्यकारी अधिकारी समीर कुर्तकोटी यांच्यासह नगर परिषद पवनी डॉ. विवेक मेश्राम यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले.

 

नगर परिषदेने तयार केलेले लोगो तसेच नगर परिषदेची mcpaunitourism या वेबसाईटचे अनावरण देखील यावेळी करण्यात आले.उपजिल्हा रुग्णालय पवनी येथी इमारत बांधकामाचे भुमिपूजन देखील डॉ.श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. आरोग्यमंत्री तानाजी सावंत हे उपजिल्हा रूग्णालयाच्या कार्यक्रमाला दूरदृष्य प्रणालीव्दारे उपस्थित होते.

 

नगर परिषदेद्वारे तयार करण्यात आलेली “एकच मिनिट पवनी या चलचित्रफितीचे अनावरण करण्यात आले. त्यानंतर “माझा वार्ड स्वच्छ सुंदर वार्ड” स्पर्धेमध्ये उत्कृष्ठ कामगिरी केलेल्या वार्डातील चमुंना प्रथम/द्वितीय/तृतीय क्रमांकाचे रोख बक्षीसे व सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच दीनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान (DAY-NULM) अंतर्गत पवनी शहरातील आनंदी महिला बचत गटाने आर्थिक उन्नतीच्या कर्तृत्वामुळे शासनाने प्रसिध्द केलेल्या कॉफी टेबल बुक मध्ये या बचत गटाचा समावेश करण्यात आला असल्यामुळे या बचत गटाचा सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच नगर परिषदेला वारंवार विविध कामात सहकार्य करणारे फ्लायकॅचर्स वाइल्ड फ्रेंड्स ग्रुपला सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.