वैनगंगा काठावरील गावात लोक संवाद कार्यक्रम संपन्न

वैनगंगा काठावरील गावात लोक संवाद कार्यक्रम संपन्न

 

भंडारा, दि. 9 : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने राज्य सरकार ‘चला जाणूया नदीला’ उपक्रम राबवित आहे. जिल्हातील वैनगंगा व चुलबंद नदीच्या संवर्धनात गावकऱ्यांचा सहभाग वाढविण्याच्या दृष्टीने “नदी संवाद यात्रा” जिल्ह्यात दोन्ही नदीच्या तिरावरील गावात संवाद साधत आहे. यासाठी जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी ह्यांच्या नेतृत्वात नदी समन्वय समितीची स्थापना करण्यात आली आहे.

 

संवाद यात्रेच्या दुसऱ्या दिवशी मोहाडी तालुक्यातील बेटाळा, रोहा, कोथूर्णा, निलज, मुंढरी (बु) व तुमसर तालुक्यातील ढोरवाडा या वैनगंगा काठावरील गावात लोक संवाद व जनजागृतीचा कार्यक्रम रविवार रोजी घेण्यात आला. या प्रसंगी नदी समन्वय समितीतर्फे शाहिद खान, अवील बोरकर व दिलीप पंधरे ह्यांनी लोकांना मार्गदर्शन केले. गावकऱ्यांना उपक्रमाचा उद्देश व रूपरेषा समजावून सांगितली. याप्रसंगी नदी बचाव मोहीम बद्दल पथनाट्य सादर करण्यात आले.

 

या कार्यक्रमाला नरेश इश्वरकर, जि.प. सदस्य महादेवजी पंचघरे, सभापती पं.स. मोहाडी रितेश वासणिक, उपसभापती पं.स. मोहाडी विठ्ठल मल्लेवार, वन परिक्षेत्र अधिकारी जामकांद्री अपेक्षा शेंडे, वन परिक्षेत्र अधिकारी तुमसर श्री. रहांगडाले, गट विकास अधिकारी पंचायत समिती मोहाडी पल्लवी वाडेकर व वनक्षेत्र जामकांद्री व तुमसरचे वन कर्मचारी, माजी सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, शिक्षकवृंद व तलाठी, ग्रामसेवक, गावकरी उपस्थित होते.