स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांचा लाभार्थ्यांशी संवाद

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांचा लाभार्थ्यांशी संवाद

Ø प्रियदर्शनी सभागृहात आयोजन

चंद्रपूर, दि. 31 मे : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर केंद्र शासनाच्या विविध योजनांच्या लाभार्थ्यांसोबत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संवाद साधला. या कार्यक्रमाचे आयोजन जिल्हा प्रशासनाद्वारे प्रियदर्शनी सभागृहात करण्यात आले होते.

पंतप्रधानांनी हिमाचल प्रदेशातील शिमला येथून दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून केंद्र सरकारच्या योजनांबाबत विविध राज्याच्या लाभार्थ्यांशी संवाद साधून आठ वर्षाच्या प्रगतीचा लेखाजोखा सर्व देशवासींयासमोर मांडला. योजनेचा लाभ मिळाल्यामुळे लाभार्थ्यांच्या चेह-यावरचे समाधान आपल्याला अधिक काम करण्याचे बळ देते, असे पंतप्रधान म्हणाले. यावेळी पंतप्रधानांच्या हस्ते किसान सम्मान निधीच्या 11 व्या हप्ताच्या 21 हजार कोटीपेक्षा अधिक रक्कम 10 कोटी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात डिबीटीद्वारे थेट जमा करण्यात आली.

            दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून मार्गदर्शन करतांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, योजना केंद्राच्या असोत किंवा राज्यांच्या, त्या सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहचविण्यासाठी राज्याच्या यंत्रणेचे मोठे योगदान असते. केंद्र पुरस्कृत योजनांमध्ये राज्याचा 40 टक्के वाटा आहे. राज्याच्या प्रशासकीय यंत्रणेने अतिशय उत्तमप्रकारे, अगदी तालुका आणि गाव पातळीवर काम करून या योजनांचा लाभ लोकांपर्यंत पोहचविला आहे. संवाद साधतांना लाभार्थींच्या चेहऱ्यावरचे समाधान पाहिले की हीच आपल्या आयुष्याची खरी कमाई वाटते. केंद्र पुरस्कृत योजना राबविण्यासाठी राज्य, जिल्हा व तालुकास्तरीय यंत्रणा सक्रिय सहभाग घेतात.

तत्पूर्वी उपस्थितांना मार्गदर्शन करतांना जिल्हाधिकारी अजय गुल्हाने म्हणाले, स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर या संवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या माध्यमातून पंतप्रधान व मुख्यमंत्री जिल्ह्यातील लाभार्थ्यांची संवाद साधून त्यांची मते जाणून घेणार आहे. जिल्हा प्रशासन सर्वांसाठी कार्यरत आहे. योजनांसंदर्भातील मते व काही सुधारणा असेल तर निश्चितपणे जिल्हा प्रशासनाला सांगावे. तसेच आपापल्या परिसरातील नागरिकांना या योजनांची माहिती देऊन लाभ घेण्यासाठी प्रवृत्त करावे, असेही ते म्हणाले.

यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी कपिल कलोडे यांनी आपल्या प्रास्ताविकेत केंद्र पुरस्कृत योजनांची माहिती उपस्थित लाभार्थ्यांना सांगितली. वेब लिंकद्वारे जोडण्यात आलेल्या या कार्यक्रमाला चंद्रपूर येथून विधिमंडळ लोकलेखा समितीचे अध्यक्ष सुधीर मुनगंटीवार, जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मिताली सेठी, पोलीस अधीक्षक अरविंद साळवे, मनपा आयुक्त राजेश मोहिते, निवासी उपजिल्हाधिकारी विशालकुमार मेश्राम, उपमुख्य कार्यकारी अधिकारी कपिल कलोडे, श्याम वाखर्डे प्रामुख्याने उपस्थित होते. याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते जिल्हा प्रशासन व जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने प्रकाशित स्वातंत्र्य संग्राम सैनिकांची माहिती असणा-या पुस्तिकेचे विमोचन करण्यात आले.

तत्पूर्वी जागतिक तंबाखु विरोधी दिनानिमित्त डॉ. मिताली सेठी यांनी उपस्थितांना तंबाखु विरोधी शपथ दिली. कार्यक्रमाचे संचालन व आभार अलका ठाकरे यांनी मानले. यावेळी जिल्ह्यातील विविध योजनांचा लाभ घेणारे लाभार्थी व नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.