पालकमंत्र्यांच्या पुढाकाराने धान खरेदी केंद्र पुन्हा सुरू Ø पिकविलेले सर्व धान खरेदी होणार

पालकमंत्र्यांच्या पुढाकाराने धान खरेदी केंद्र पुन्हा सुरू

Ø पिकविलेले सर्व धान खरेदी होणार

चंद्रपूर, दि. 29 मे : धान खरेदी बाबत शेतकरी चिंतेत असतांनाच जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी पुढाकार घेऊन धान उत्पादक शेतक-यांना दिलासा दिला आहे. पालकमंत्र्यांच्या पुढाकाराने सर्व धान खरेदी केंद्र 31 मे पासून पुन्हा सुरू होणार असून शेतक-यांनी पिकविलेल्या सर्व धानाची खरेदी केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.

जिल्ह्यात धानाची उत्पादकता प्रति हेक्टरी 31 क्विंटल 24 किलो आहे. याप्रमाणे जिल्ह्यात 39 हजार 921 धान खरेदीचे उद्दिष्ट आहे. मात्र केंद्र सरकारने राज्याला धानाचा खरेदी कोटा कमी दिल्याने शेतक-यांनी पिकविलेला धान तसाच राहतो की काय, ही चिंता कायम असतांना पालकमंत्र्यांच्या पुढकाराने धान खरेदीचा कोटा वाढवून देण्यासाठी केंद्र सरकारला पत्र पाठविण्यात आहे. त्यामुळे आता धान खरेदीची मर्यादा राहणार नसून सर्व धानाची खरेदी करण्यात येणार आहे.

राज्यातील नऊ जिल्ह्यात धानाचे पीक घेतले जाते. यात नागपूर (शेतकरी नोंदणी – 1682), चंद्रपूर (नोंदणी 4843), गडचिरोली 4880, भंडारा 59685, गोंदिया 58120, रायगड 4169, नांदेड 33, सिंधुदुर्ग 22 आणि कोल्हापूर येथे 9 अशा एकूण 1 लक्ष 33 हजार 443 शेतकऱ्यांची नोंदणी झाली आहे. तसेच संपूर्ण राज्यासाठी धान खरेदीचे उद्दिष्ट 11 लक्ष क्विंटल आहे. महाराष्ट्राची धान उत्पादकता 1.86 एलएमटी असून केंद्र शासनाने केवळ 1.50 एलएमटी धान खरेदीस मान्यता दिली आहे. यात मार्केटिंग फेडरेशनकरिता 1.10 एलएमटी तर आदिवासी विकास मंडळाला 0.40 एलएमटी इतके धान खरेदीचे उद्दिष्ट नेमून देण्यात आले आहे.