विविध योजना लाभार्थ्यांशी मा. पंतप्रधान साधणार संवाद   चंद्रपूर जिल्हा प्रशासनातर्फे  प्रियदर्शिनी सभागृह येथे कार्यक्रमाचे आयोजन

विविध योजना लाभार्थ्यांशी मा. पंतप्रधान साधणार संवाद  
चंद्रपूर जिल्हा प्रशासनातर्फे  प्रियदर्शिनी सभागृह येथे कार्यक्रमाचे आयोजन

चंद्रपूर ३० मे – भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त देशाचे मा. प्रधानमंत्री श्री. नरेंद्र मोदी हे मंगळवार, 31 मे 2022 रोजी सकाळी 10.15 ते 10.50 या वेळेत राज्य आणि जिल्हा कार्यक्रमांच्या स्वरूपात तर सकाळी 11 ते दुपारी 12.10 या कालावधीत सिमला (हिमाचल प्रदेश) येथून केंद्र सरकारच्या विविध योजनांच्या लाभार्थ्यांशी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संवाद साधणार आहेत.
भारतीय स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण होत असल्याने केंद्र शासनाच्या वतीने देशभरात विविध उपक्रम राबवून स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्यात येत आहे. देशातील कोणताही नागरिक विकासापासून वंचित राहू नये व त्याच्या विविध गरजा सर्वसमावेशक आणि एकत्रितपणे पूर्ण होण्यासाठी शासनाने लाभार्थ्यांवर लक्ष केंद्रीत केले आहे.  यावेळी मा. पंतप्रधान देशातील कोणत्‍याही राज्‍यामधील कोणत्याही जिल्‍ह्यातील योजनेचा लाभ घेतलेल्‍या लाभार्थ्‍यांशी थेट
संवाद साधणार आहेत. सदर कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण हे दुरदर्शन, इतर राष्ट्रीय चॅनेल, यु ट्युब व NIC चॅनेलवर केले जाणार आहे. संपुर्ण देशात साजरा होणाऱ्या या कार्यक्रमाचे आयोजन चंद्रपूर जिल्हा प्रशासनातर्फे  प्रियदर्शिनी सभागृह येथे करण्यात आले आहे.तरी जास्तीत जास्त नागरिकांनी या कार्यक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन चंद्रपूर शहर महानगरपालिकेतर्फे करण्यात येत आहे.
या योजनांमध्ये प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण व शहरी), प्रधानमंत्री किसान सन्मान निधी, प्रधानमंत्री उज्वला योजना, पोषण अभियान, प्रधानमंत्री मातृ वंदना योजना, स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण व शहरी), जलजीवन मिशन आणि अमृत योजना, प्रधानमंत्री स्व निधी योजना, एक राष्ट्र एक राशनकार्ड योजना, प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना, आयुष्यमान भारत पीएम जनआरोग्य योजना, आयुष्यमान भारत हेल्थ ॲन्ड वेलनेस सेंटर आणि प्रधानमंत्री मुद्रा योजनेचा समावेश आहे.