धान खरेदीचा कोटा वाढवून देण्यासाठी पालकमंत्र्यांच्या पुढाकाराने केंद्राला पत्र

धान खरेदीचा कोटा वाढवून देण्यासाठी पालकमंत्र्यांच्या पुढाकाराने केंद्राला पत्र

चंद्रपूर, दि. 29 मे : केंद्र सरकारने राज्याला धानाचा खरेदी कोटा कमी दिला आहे. हा कोटा वाढवून देण्यासाठी पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या पुढाकाराने केंद्र सरकारला पत्र पाठवले असून पुढील दोन-तीन दिवसात धान खरेदीचा कोटा वाढवून मिळेल. त्यामुळे शेतकऱ्यांनी धान खरेदीबाबत काळजी करण्याचे कारण नाही, असे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले.

राज्यात नऊ जिल्हे धान उत्पादक असून एकूण शेतकऱ्यांची नोंदणी 1 लक्ष 33 हजार 443 झाली आहे. तसेच संपूर्ण राज्यासाठी धान खरेदीचे उद्दिष्ट 11 लक्ष क्विंटल आहे. चंद्रपूरमध्ये 4143 शेतकरी नोंदणी झाली असून धान खरेदीचे उद्दिष्ट 39 हजार 921 क्विंटल आहे.  महाराष्ट्राची धान उत्पादकता 1.86 एलएमटी असून केंद्र शासनाने केवळ 1.50 एलएमटी धान खरेदीस मान्यता दिली आहे. यात मार्केटिंग फेडरेशनकरिता 1.10 एलएमटी तर आदिवासी विकास मंडळाला 0.40 एलएमटी इतके धान खरेदीचे उद्दिष्ट नेमून देण्यात आले आहे. राज्य शासनाने अतिरिक्त धान खरेदीचा फेरप्रस्ताव केंद्र शासनाला पाठवला असून यावर लवकरच तोडगा काढला जाईल व धान खरेदीबाबत शेतकऱ्यांना दिलासा मिळेल, असा विश्वास पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केला.