वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळाच्या विविध योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन

वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळाच्या विविध योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन

चंद्रपूर दि. 24 मे : वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळामार्फत, विमुक्त जाती व भटक्या जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गातील नागरिकांकरीता स्वयंरोजगाराच्या माध्यमातून कृषी संलग्न व्यवसाय, लघुउद्योग, वाहतूक क्षेत्रातील संबंधित व्यवसाय, तांत्रिक व्यवसाय, पारंपारिक व्यवसाय अथवा सेवा उद्योग सुरू करण्यासाठी राष्ट्रीयीकृत बँक व महामंडळाच्या संयुक्त माध्यमातून वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना व गट कर्ज व्याज परतावा योजना सुरू आहे.

वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजनेअंतर्गत जास्तीत जास्त रु. 10 लाखापर्यंत कर्ज पुरवठा तर गट कर्ज व्याज परतावा योजनेअंतर्गत रु.50 लाखापर्यंत कर्ज पुरवठा करण्यात येतो. संबंधित योजनांच्या सर्व मार्गदर्शक सूचना महामंडळाच्या www.vjnt.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. सदर योजनेच्या लाभासाठी संकेतस्थळावरील पोर्टलद्वारे ऑनलाईन प्रस्ताव सादर करावयाचे आहे.

तसेच बीज भांडवल कर्ज योजनेतंर्गत रु. 5 लाखापर्यंत तर थेट कर्ज योजनेतंर्गत रु. 1 लाख बिनव्याजी कर्ज पुरवठा करण्यात येतो. या योजनेच्या लाभाकरीता महामंडळाच्या कार्यालयात अर्ज उपलब्ध आहेत. योजनेच्या अधिक माहितीकरीता महामंडळाच्या कार्यालयात प्रत्यक्ष भेट द्यावी. इच्छुक व्यक्ती व संस्थांनी सदर योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक शंकर कुमरे यांनी केले आहे.