स्थानिक रोजगाराच्या निर्मितीकरिता 28 ते 30 मे दरम्यान उद्यमिता यात्रा व प्रशिक्षण शिबीर Ø गरजू व होतकरू उमेदवारांनी सहभाग नोंदविण्याचे आवाहन

स्थानिक रोजगाराच्या निर्मितीकरिता

28 ते 30 मे दरम्यान उद्यमिता यात्रा व प्रशिक्षण शिबीर

Ø गरजू व होतकरू उमेदवारांनी सहभाग नोंदविण्याचे आवाहन

            चंद्रपूर, दि.23 मे : कोरोनाच्या संकटामुळे ग्रामीण तसेच शहरी अर्थव्यवस्थेवर विपरीत परिणाम होऊन अनेकांचे रोजगार बुडाले. काहींच्या नोक-या गेल्या तर लघु आणि मध्यम व्यवसाय बंद झाले. यावर मात करण्यासाठी गरजु व होतकरू उमेदवारांकरीता महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास व रोजगार उद्योजकता विभाग, जिल्हा प्रशासन आणि युथ एड फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने 28 ते 30 मे या कालावधीत उद्यमिता यात्रा व प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

            जिल्हा परिषदेच्या मा.सा. कन्नमवार सभागृहात सकाळी 10 ते दुपारी 3 वाजेपर्यंत होणा-या या प्रशिक्षण शिबिरात महिला व युवकांना व्यवसाय करण्यासाठी प्रोत्साहन देऊन तज्ज्ञ मंडळीकडून उद्योगाबाबत मार्गदर्शन होणार आहे. यात व्यवसायाचे नियोजन करणे, केंद्र आणि राज्य शासनाच्या योजनांची ओळख करून देणे, त्यासाठी लागणा-या अटींची पुर्तता करण्यासाठी मार्गदर्शन करणे, आर्थिक तसेच डीजीटल साक्षर करणे, व्यवसायाचे पर्याय सुचविणे, व्यवसायासाठी बाजारात उपलब्ध असलेल्या संधीबाबत माहिती देणे तसेच नवीन व्यावसायिकांना बीज भांडवल योजनेबाबत मार्गदर्शन करणे आदींचा समावेश आहे.

            कौशल्य विकास विभागाच्या वतीने राज्यभर उद्यमिता यात्रा व प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात येत असून जिल्ह्यातील गरजू व होतकरू उमेदवारांनी सहभाग नोंदवण्याकरिता जिल्हा समन्वयक मुकेश मुंजनकर, अजय चंद्रपट्टण यांच्याशी, जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, प्रशासकीय इमारत, चंद्रपूर, दूरध्वनी क्रमांक 07172 – 252295 तसेच सुशिलाबाई मामिडवार समाजकार्य महाविद्यालयाचे प्रा. किरणकुमार मनुरे (मो. 9970269242) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन सहायक आयुक्त भैय्याजी येरमे यांनी केले आहे.