कृषी विभागाची निंबोळी गोळा करणे मोहीम Ø शेतकऱ्यांना निंबोळी अर्काचा वापर करण्याचे आवाहन

कृषी विभागाची निंबोळी गोळा करणे मोहीम

Ø शेतकऱ्यांना निंबोळी अर्काचा वापर करण्याचे आवाहन

चंद्रपूर, दि. 20 मे : निंबोळी अर्क म्हणजे कडुलिंब या झाडांच्या बियांपासून (निंबोण्या) काढलेला अर्क होय. कडुलिंबाच्या झाडांमध्ये असलेली ॲझाडिरॅक्टीन किटकनाशकाचे काम करते. या घटकाचे प्रमाण बियाण्यांमध्ये जास्त प्रमाणात असते. निंबोळयापासून तयार केलेल्या अर्काचा वापर पिकावरील बऱ्याच किडींचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी  होतो. जसे की, मावा, अमेरीकन बोंडअळी , तुडतुडे, पाने पोखरणाऱ्या व देठ कुरतडणाऱ्या अळया, फळमाशा, खोडकिडा आदी अनेक किडींवर याचा प्रभाव पडतो व त्यांचा बंदोबस्त होतो, हे निंबोळी अर्काचे महत्व आहे.

निंबोळी अर्काची फवारणी सध्यांकाळच्या सुमारास म्हणजे दुपारी 4 वाजेनंतर करणे योग्य असते. तयार केलेला फवारा झाडावर कुठेही पडला तरी तो आंतरप्रवाही असल्यामुळे पुर्ण झाडात पोहचतो.

5 टक्के निंबोळी अर्क तयार करण्याची पध्दती:

उन्हाळयात (पावसाळयाच्या सुरूवातीस) निंबोळी उपलब्ध असतांना जमा कराव्यात. त्या चांगल्या वाळवून साफ कराव्यात आणि साठवून ठेवाव्यात. फवारणीच्या आदल्या दिवशी आवश्यक तितक्या निंबोळया कुटून बारीक कराव्यात. पाच किलो निंबोळीचा चुरा 9 लिटर पाण्यात (फवारणीच्या आदल्या दिवशी सायंकाळी) भिजत टाकावा. तसेच एक लिटर पाण्यात 200 ग्रॅम साबणाचा चुरा वेगळा भिजत टाकावा. दुसऱ्या दिवशी सकाळी निंबोळीचा अर्क फडक्यातून चांगला गाळून घ्यावा. या अर्कात एक लिटर पाण्यात तयार केलेले साबणाचे द्रावण मिसळावे. हा सर्व अर्क एकूण 10 लिटर होईल एवढे पाणी टाकावे. तयार केलेला एक लिटर अर्क, 9 लिटर पाण्यात मिसळून ढवळावा व फवारणीसाठी वापरावा. अशाप्रकारे निंबोळी अर्क फवारणीच्या दिवशीच तयार करून वापरावा.

                  आठ महिण्यापेक्षा जुन्या निंबोळया वापरू नका. कारण, इतक्या जुन्या बियांमध्ये पाहिजे ती किडनाशक शक्ती राहत नाही. नेहमी निंबोळयाचा ताजा अर्क वापरावा. निंबोळी अर्क वापरल्याने रासायनिक किटकनाशकाचा वापर कमी होऊन पैशाची बचत होते. तसेच किडीचा बंदोबस्त होतो. त्यामुळे शेतकरी बंधुनी निंबोळी अर्काचा वापर करावा. असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी भाऊसाहेब बऱ्हाटे यांनी केले आहे.