जिल्ह्यातील मानव विकास कार्यक्रमांतर्गत सायकल वाटप योजनेवर भर द्यावा मानव विकास आयुक्तांचे जिल्हा प्रशासनाला निर्देश

जिल्ह्यातील मानव विकास कार्यक्रमांतर्गत सायकल वाटप योजनेवर

भर द्यावा मानव विकास आयुक्तांचे जिल्हा प्रशासनाला निर्देश

भंडारा, दि. 19 : मानव विकास कार्यक्रमांतर्गत मानव विकास आयुक्तालयाच्या माध्यमातून प्रत्येक जिल्ह्यात विविध योजना राबविण्यात येतात. या योजनांमध्ये मुलींचा शिक्षणातील टक्का वाढविण्यासाठी व त्यांचा शैक्षणिक विकास होण्यासाठी सायकल वाटप योजनेवर भर देण्याचे निर्देश मानव विकास आयुक्त नितीन पाटील यांनी दिले.

भंडारा जिल्ह्याच्या दोन दिवसीय दौऱ्यावर आलेल्या श्री. पाटील यांनी मानव विकास योजनेच्या अंमलबजावणीसाठी कार्यरत असणाऱ्या यंत्रणांना प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली. तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात घेतली. यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप चौधरी, जिल्हा नियोजन अधिकारी मृणालिनी भूत व अन्य कार्यान्वित यंत्रणेचे अधिकारी उपस्थित होते.

या बैठकीत त्यांनी 2022-23 करिता प्रती तालुका दोन कोटी निधी उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याचे सांगितले.  यासाठी शेळीपालन, कुक्कुटपालन व मत्स्यपालन यावर अधिक भर देण्यासाठी प्रस्ताव सादर करण्यासाठी सुचित केले. तसेच शिक्षणाधिकारी (माध्यमिक) यांनी जास्तीत जास्त विद्यार्थीनींना सायकल वाटप करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मानव विकास कक्षास प्रस्ताव सादर करावे, असे सांगितले.

गरोदर माता, स्तनदा माता यांचे आरोग्य सुस्थितीत रहावे व हिमोग्लोबीन वृद्धींगत व्हावे यासाठी जिल्हा आरोग्य अधिकारी यांना उपाययोजनात्मक प्रस्ताव सादर करणेसाठी सुचित केले. तसेच त्यांनी मंगळवार (17 मे) रोजी साकोली तालुक्यात माविम अंतर्गत इ रिक्षा उपक्रम, कांडप यंत्र व बारदाना विक्री युनिट या कामांची पाहणी केली.  दि. 18 मे रोजी आंधळगाव येथे कोसा कापडनिर्मिती युनिट व वरठी येथील काथा वर्क युनिट या कामांची पाहणी केली. प्रस्ताव सादर करतांना बचतगट हे प्रामुख्याने अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती,  समाजातील वंचित वर्ग व गोरगरीब यांचे गट अंतर्भूत असावे, अश्या सूचना त्यांनी यावेळी दिल्यात.