नागरिकांची मते जाणून घेण्यासाठी समर्पित आयोगाचा दौरा जाहीर

नागरिकांची मते जाणून घेण्यासाठी समर्पित आयोगाचा दौरा जाहीर

            चंद्रपूर / नागपूर, दि. 14 मे : राज्यातील जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायती तसेच  महानगरपालिका, नगरपालिका आणि नगरपंचायती या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये नागरिकांच्या मागास प्रवर्गास (इतर मागास वर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती) आरक्षण देण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशाप्रमाणे महाराष्ट्र शासनाने समर्पित आयोग स्थापन केला आहे.

            राज्यातील ग्रामीण आणि शहरी भागातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील नागरिकांच्या मागास प्रवर्गातील आरक्षणासाठी जनतेची मते जाणून घेण्यासाठी आणि या क्षेत्रात काम करणाऱ्या विविध सामाजिक संघटना यांची निवेदने स्वीकारण्यासाठी या समर्पित आयोगाने विभागवार कार्यक्रम जाहीर केला आहे.

            समर्पित आयोगाचे सदस्य शनिवारी  (दि.21 मे 2022)  सकाळी 9.30 ते सकाळी 11.30 वाजता विभागीय आयुक्त कार्यालय, पुणे येथे भेट देतील. रविवारी (दि.22 मे)  सकाळी 9.30 ते सकाळी 11.30 वाजता विभागीय आयुक्त कार्यालय, औरंगाबाद तर याच दिवशी सायंकाळी 5.30 ते सायंकाळी 7.30 पर्यंत विभागीय आयुक्त कार्यालय, नाशिक येथे भेट देईल. बुधवारी  (दि.25 मे) दुपारी 2.30 ते दुपारी 4.30 वाजता विभागीय आयुक्त कार्यालय, कोकण भवन येथे भेट देतील.

 नागपूर येथे 28 मे रोजी दौरा

शनिवारी  (दि.28 मे) रोजी सकाळी 9.30 ते सकाळी 11.30 वाजता विभागीय आयुक्त कार्यालय, अमरावती येथे आयोगाने भेट दिल्यानंतर याच दिवशी सायंकाळी 4.30 ते सायंकाळी 6.30 वाजेपर्यंत विभागीय आयुक्त कार्यालय, नागपूर येथे हा आयोग नागरिकांची मते जाणून घेणार आहे.

            या समर्पित आयोगाच्या नागपूर येथील भेटीत ज्या नागरिक तसेच संस्था, संघटनांना आपली मते मांडायची आहेत त्यांनी नागपूर विभागीय आयुक्त कार्यालयात आपल्या नावाची नोंदणी शुक्रवारी (27 मे रोजी) सायंकाळी 6 वाजेपर्यंत करावी. तसेच यासाठी संबंधित विभागीय आयुक्त कार्यालयाशी संपर्क करावा, असे आवाहन या समर्पित आयोगाचे सदस्य सचिव पंकज कुमार (भा.प्र.से.) यांनी केले आहे.