वात्सल्य योजनेची प्रभावी अंमलबजावणी करावी-जिल्हाधिकारी संदीप कदम

वात्सल्य योजनेची प्रभावी अंमलबजावणी करावी-जिल्हाधिकारी संदीप कदम

  • साप्ताहिक बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

भंडारा, दि. 11 : महिला व बालविकास विभागाद्वारे कोरोना मुळे विधवा झालेल्या महिला व अनाथ बालके यांना मिशन वात्सल्य योजने अंतर्गत विविध चोवीस योजनांचा तातडीने लाभ देण्याच्या शासनाचे आदेश आहेत. त्यानुसार तहसीलदार व अन्य यंत्रणांनी समन्वयाने काम करावे. जिल्ह्यात कोरोना बळी असल्याने त्यांच्या कुटुंबीयांच्या पुनर्वसनासाठी अधिकाऱ्यांनी संवेदनशीलता दाखवावी, अशी अपेक्षाही जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी व्यक्त केली.

जिल्ह्यातील अडी अडचणी व तक्रारींचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी संदीप कदम हे साप्ताहिक बैठक घेतात. नुकत्याच झालेल्या बैठकीत त्यांनी वात्सल्य योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी तहसीलदार व संबंधित विभागप्रमुखांची बैठक घेण्याचे निर्देश दिले. साधारणत: दर मंगळवारी होणाऱ्या आठवडी सभेत विविध विषयांचा तसेच प्रलंबित कामांचा आढावा जिल्हाधिकारी घेत असतात. या बैठकीला निवासी उपजिल्हाधिकारी महेश पाटील सह सर्व विभागप्रमुख उपस्थित होते.

कोरोना मुळे विधवा झालेल्या महिला व अनाथ बालके यांना मिशन वात्सल्य योजने अंतर्गत विविध चोवीस योजनांचा तातडीने लाभ देण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. शासन आपल्या दारी या संकल्पनेवर आधारित कर्मचाऱ्यांनी या लाभार्थ्यांशी संपर्क साधून त्यांच्या अडचणी जाणून घ्याव्यात. या लाभार्थ्यांना बँक खाते काढून देण्यास मदत करावी तसेच निराधार योजनेचा लाभ मिळवून देण्याबाबत प्रस्ताव दाखल करावेत.

शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्याच्या कामकाजात एकसूत्रता व गतिमानता आणण्यासाठी तालुकानिहाय अधिकारी-कर्मचारी यांच्या पथकाने प्रत्यक्ष लाभार्थ्यांच्या घरी भेटी देऊन त्यांचे सर्वेक्षण करावे. या योजनांपासून एकही लाभार्थी वंचित राहता कामा नये याची दक्षता घ्यावी. तालुकास्तरीय अधिकाऱ्यांनी वेळोवेळी या संदर्भातील आढावा घेऊन क्षेत्रीय पातळीवरील कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करावे वेळ पडल्यास स्वतः लाभार्थ्यांच्या भेटी घेऊन त्यांना मदत करण्याच्या सूचना श्री. कदम यांनी दिल्या आहेत.