पीसीपीएनडीटी : 9203 ऑनलाईन एफ फॉर्मची तपासणी Ø प्रभारी जिल्हाधिका-यांनी घेतला जिल्हा दक्षता पथकाचा आढावा                            

पीसीपीएनडीटी : 9203 ऑनलाईन एफ फॉर्मची तपासणी

Ø प्रभारी जिल्हाधिका-यांनी घेतला जिल्हा दक्षता पथकाचा आढावा                                               

चंद्रपूर दि. 4 मे : गर्भधारणापूर्व व प्रसवपूर्व निदान तंत्र (लिंग निवडीस प्रतिबंध) अधिनियम 2003 (पीसीपीएनडीटी) अंतर्गत जिल्हा दक्षता पथकाचा आढावा प्रभारी जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला.

जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या या बैठकीला जिल्हा शल्य चिकित्सक यांचे प्रतिनिधी म्हणून डॉ. मेश्राम, मनपाच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. वनिता गर्लेलवार, डॉ. स्नेहा उत्तरवार, वैद्यकीय अधिकारी डॉ. मनिष सिंग, डॉ. अंकूश राठोड, डॉ. गोपाल भगत, डॉ. रोहन झाडे, डॉ. इंदूरकर, डॉ. वाघधरे, डॉ. रवि गावंडे, ॲङ मंगला बोरकर आदी उपस्थित होते.

जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाच्यावतीने जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात राबविण्यात आलेल्या सोनोग्राफी केंद्राच्या विशेष तपासणी मोहिमेंतर्गत जिल्ह्यातील 50 सोनोग्राफी केंद्रात 9203 ऑनलाईन एफ फॉर्मची तपासणी करण्यात आली. यात वरोरा येथील 8 सोनोग्राफी केंद्रातील 1255 एफ फॉर्म, भद्रावती येथील 5 केंद्रात 330, बल्लारपूर येथे 3 केंद्रात 272, मुल येथील 2 केंद्रात 199, ब्रम्हपूरी 15 केंद्रात 3718, राजुरा 2 केंद्रात 343, सिंदेवाही 3 केंद्रात 994, गडचांदूर 2 केंद्रात 543, सावली 1 केंद्रात 266, नागभीड 3 केंद्रात 509, घुग्घुस 2 केंद्रात 17,  चिमूर 3 केंद्रात 249 आणि गोंडपिपरी येथील 1 केंद्रात 508 एफ फॉर्मचा समावेश असल्याची माहिती बैठकीत देण्यात आली.

तालुका स्तरावर ज्यांनी दक्षता पथकाच्या बैठका नियमित घेतल्या नाही, त्याबाबत प्रभारी जिल्हाधिका-यांनी नाराजी व्यक्त करून अशा बैठका नियमित घेण्याचे निर्देश दिले. यावेळी त्यांनी सोनोग्राफी केंद्राची तपासणी, केंद्राची नोंदणी व नुतणीकरण, जिल्हा व तालुका सल्लागार समितीच्या बैठका, न्यायालयीन प्रकरणे, टोल फ्री क्रमांकावर प्राप्त झालेल्या तक्रारीवर करण्यात आलेली कार्यवाही, स्त्री भ्रुण हत्या टाळण्याच्या अनुषंगाने करण्यात आलेली जनजागृती आदींबाबत त्यांनी आढावा घेतला.