विकासाच्या बाबतीत सिंदेवाहीचा चेहरामोहरा बदलणार – पालकमंत्री विजय वडेट्टीवार Ø रस्ते, पूल, पांदणरस्ते, शासकीय इमारती आदींचा समावेश Ø पालकमंत्र्यांच्या हस्ते विविध विकास कामांचे भुमिपूजन

विकासाच्या बाबतीत सिंदेवाहीचा चेहरामोहरा बदलणार – पालकमंत्री विजय वडेट्टीवार

Ø रस्ते, पूल, पांदणरस्ते, शासकीय इमारती आदींचा समावेश

Ø पालकमंत्र्यांच्या हस्ते विविध विकास कामांचे भुमिपूजन

चंद्रपूर दि. 2 मे : सिंदेवाही आणि परिसरातील नागरिकांच्या सोयीसाठी रस्ते, नदीवरील पूल, रेल्वे उड्डाण पूल, विविध शासकीय इमारतींचे बांधकाम, सिंचनाच्या सुविधा, पिण्याचे शुध्द पाणी, पांदणरस्ते आदी विकासकामे हाती घेण्यात आली आहेत. यातील काही पूर्ण झाली तर काही प्रगतीपथावर आहेत. एकूणच या परिसराच्या विकासासाठी भरघोस निधीची तरतुद केली असून पुढील दोन वर्षात सिंदेवाहीचा चेहरामोहरा बदललेला दिसेल, अशी ग्वाही राज्याचे मदत व पुनर्वसन, इतर मागास बहुजन कल्याण विभाग, आपत्ती व्यवस्थापन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली.

सिंदेवाही येथे 33 कोटी रुपये खर्च करून बांधण्यात येणाऱ्या शिवाजी चौक ते स्मशानभुमी पर्यंतच्या मुख्य रस्त्याचे सिमेंट क्राँक्रिटीकरण व सौंदर्यीकरण कामाचे भुमिपूजन करतांना ते बोलत होते. यावेळी मंचावर गडचिरोलीचे माजी आमदार डॉ. नामदेव उसेंडी, नगर पंचायतीचे अध्यक्ष स्वप्नील कावळे, उपाध्यक्ष मयूर सुचक, सा.बां. विभागाचे कार्यकारी अभियंता हेमंत कोठारी, उपअभियंता माधव गावड, हसनअली गिलानी, सुनील उट्टलवार, रमाकांत लोधे, अरुण कोलते, सीमा सहारे, रघुनाथ शेंडे, बापूराव गेडाम, विरु जयस्वाल आदी उपस्थित होते.

महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्या शुभेच्छा देतांना पालकमंत्री म्हणाले, आज 1 मे रोजी महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेला 62 वर्षे पूर्ण झाली असून या राज्याने देशात विकासाचे शिखर उभे केले आहेसामाजिक, सांस्कृतिक, औद्योगिक, शैक्षणिक अशा सर्वच क्षेत्रात महाराष्ट्राने देशाची मान उंचावली आहे. इतर राज्यांपेक्षा आपल्या राज्याची प्रगती ही सुरवातीपासूनच उल्लेखनीय राहिली आहे.

जिल्ह्याच्या विकासाबाबत ते म्हणाले, पूर्वीच्या आणि आताच्या सिंदेवाहीत नागरिकांना विकासात्मक बदल जाणवत आहे. या परिसराचा विकास आणि सेवेच्या बाबतीत कोणतीही कमतरता राहू देणार नाही. येथील मुख्य शिवाजी चौकात छत्रपतींचा अश्वरूढ पुतळा आणि सौंदर्यीकरणासाठी 2 कोटी 50 लक्ष तर घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासाठी 1 कोटी 15 लक्ष रुपये मंजूर करण्यात आले आहेत. याशिवाय येथील विश्रामगृहासाठी 2 कोटी, नगर पंचायतीची प्रशासकीय इमारत 3 कोटी, तहसील कार्यालय इमारत 14 कोटी, पंचायत समिती इमारत 12 कोटी 36 लक्ष, सिंदेवाही-पाथरी रेल्वे उड्डाणपूल 92 कोटी, ग्रामीण रुग्णालय व निवासस्थान 40 कोटी, आठवडी बाजार विकसीत करणे 2 कोटी, कर्मचारी निवासस्थान बांधकाम 8 कोटी 24 लक्ष, क्रीडा संकूल 7 कोटी, औद्योगिक प्रशिक्षण संस्था 4 कोटी 91 लक्ष,  लेंढाळा तलाव सौंदर्यीकरण 10 कोटी अशा विविध विकासकामांसाठी दोन वर्षात निधी प्रस्तावित आहे.

बेरोजगारीवर मात करण्यासाठी आगामी काळात आश्वासक तोडगा काढण्यात येईल. तसेच शेतकऱ्यांसाठी प्रक्रिया उद्योगाच्या माध्यमातून शेतकरी उत्पादक गट निर्माण करण्याचे नियोजन आहे. यासाठी 22 कंपन्यांसोबत बोलणी सुरू आहे. पुढील काळात नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी जनता दरबार घेण्यात येईल. या परिसरात एकही पांदण रस्ता शिल्लक राहणार नाही. 300 किलोमीटरचे पांदण रस्ते आराखड्यात घेण्यात येत आहे, असेही पालकमंत्री म्हणाले. निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींनी नागरिकांशी सन्मानाने वागावे. नगरसेवकांनी लोकांच्या छोट्या छोट्या समस्या त्वरित सोडवाव्यात, अशा सुचना त्यांनी केल्या.

यावेळी पालकमंत्र्यांच्या हस्ते सिंदेवाही – लोनवाही येथील शांतीधाम स्मशानभुमी अंदाजित किंमत 1 कोटी 50 लक्ष, आठवडी बाजार बांधकाम व खुले भुखंड विकसीत करणे अंदाजित किंमत 2 कोटी 50 लक्ष या कामांचे सुध्दा भुमिपूजन करण्यात आले. यावेळी दिव्यांगांना स्वयंचलित तीन चाकी सायकलचे वितरण करण्यात आले.

कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात कार्यकारी अभियंता श्री. कोठारी म्हणाले, येथील मुख्य रस्त्यासाठी पहिले 13 कोटी व नंतर 20 कोटी अशी एकूण 33 कोटींची प्रशासकीय मान्यता प्राप्त झाली. दोन वर्षात चार पदरी रस्ता येथे होणार असून विभाजक, पेवर ब्लॉक, दोन किमी नालीचे बांधकाम आदीचा यात समावेश आहे. यावेळी इतरही मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने नागरिकांची उपस्थिती होती.