chandrapur I जाणुन घ्या “म्युकरमायकोसिस” आजाराची लक्षणे

वेळीच उपचार घेतल्यास “म्युकरमायकोसिस” आजाराचा धोका टाळता येऊ शकतो – जिल्हाधिकारी अजय गुल्हाने

 चंद्रपूर दि. 22 मे : “म्युकरमायकोसिस” हा आजार कोरोना विषाणूमुळे उद्भवणारा एक बुरशीजन्य संसर्ग आहे. हा एक अति जलद पसरणारा बुरशीजन्य रोग आहे. जो मुख्यत: नाक, डोळे आणि मेंदू यांना बाधित करतो. कोरोना आजारातून बरे झालेल्या काही रूग्णांना “म्युकरमायकोसिसचा” धोका निर्माण झाला आहे. हा आजार रोगप्रतिकारशक्ती कमी झालेल्या रूग्णांमध्ये आढळतो, तसेच ज्या रुग्णांना मधुमेह आहे अशा रुग्णांमध्ये या आजाराची लक्षणे दिसून येतात. मात्र वेळीच उपचार घेतल्यास “म्युकरमायकोसिस” या आजाराचा धोका टाळता येऊ शकतो. असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे. कोरोना संसर्गाबरोबरच “म्युकरमायकोसिस” या आजाराने रुग्णांच्या चिंतेत आणखीच भर टाकली आहे. साधारणपणे नाक किंवा सायनसच्या माध्यमातून शरीरात प्रवेश करते. प्रामुख्याने हा आजार कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांत फैलावत असल्याचे आढळून येत आहे. कोरोनातून बरे झाल्यानंतर “म्युकरमायकोसिस” हा बुरशीजन्य आजार विशेषत्वाने मधुमेही, मूत्रपिंडाशी संबंधित आजार, अवयव प्रत्यारोपण केलेल्या व्यक्तींना होत असल्याचे आढळून येत आहे. अशा व्यक्तींनी सहा आठवड्या पर्यंत काळजी घेणे आवश्यक आहे. ही आहेत “म्युकरमायकोसिस” आजाराची लक्षणे : * चेहऱ्याचे स्नायू दुखणे, चेहऱ्यावर बधिरपणा येणे. * गाल दुखणे व गालावर सूज येणे. * तीव्र डोकेदुखी. * नाकावर सूज येणे,नाक दुखणे व नाक सतत वाहू लागणे. * चेहरा अथवा डोळ्यांवर सूज येणे व डोळे दुखणे. * दृष्टी अधू होणे व डोळ्यापुढे दोन प्रतिमा दिसणे. * दात दुखणे किंवा हलु लागणे. वरील लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा व वेळेत उपचार करून घ्यावेत. घ्यावयाची काळजी : * लक्षणे दिसू लागल्यास त्वरित नाक, कान, घसा व दंत तज्ञ डॉक्टरांशी संपर्क साधावा. * मधुमेह असणाऱ्या व्यक्तींनी रक्तातील साखरेचे प्रमाण नियमित तपासून नियंत्रणात असल्याची खात्री करावी. *रक्तातील साखर वाढल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. * मास्क नियमित वापरावा व वैयक्तिक स्वच्छतेकडे अधिक लक्ष द्यावे. *डॉक्टरांनी दिलेले औषधोपचार नियमित घ्यावेत.