chandrapur I रेमडेसिवीर इंजेक्शन डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शननुसारच : जिल्हाधिकारी अजय गुल्हाने Ø नातेवाईक अथवा लोकप्रतिनिधी यांची शिफारस ग्राह्य नाही

रेमडेसिवीर इंजेक्शन डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शननुसारच : जिल्हाधिकारी अजय गुल्हाने

Ø नातेवाईक अथवा लोकप्रतिनिधी यांची शिफारस ग्राह्य नाही

चंद्रपूर दि.4 मे : जिल्हा प्रशासनाकडून रेमडेसिवीर इंजेक्शन मिळण्याची प्रक्रिया जाहीर करण्यात आली असून रुग्णांचे नातेवाईक अथवा लोकप्रतिनिधी यांच्या सांगण्यावरून किंवा त्यांच्या शिफारशीने वाटप न होता सदर रुग्णालयात प्राप्त होणाऱ्या साठ्यातून त्या रुग्णालयातील डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनच्या आधारे व गरजेनुसारच रेमडेसिवीर इंन्जेक्शनचे वाटप करण्यात येते अशी माहिती जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी दिली आहे.

जिल्हा प्रशासनाच्या निर्देशानुसार रेमडेसिवीर इंजेक्शनचे रूग्णालय निहाय वाटप करण्यात येते. यात मुख्य उत्पादकाकडून, वितरक व स्टॉकिस्टकडे इंजेक्शन प्राप्त होतात. तद्नंतर अन्न व औषध प्रशासन अधिकारी यांचेकडून जिल्ह्यात कार्यरत कोविड रुग्णालये, डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर आणि डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल यामध्ये भरती रुग्णांच्या आधारे रुग्णालयनिहाय समप्रमाणात रेमडेसिवीर इंजेक्शन वाटपाचे वर्गीकरण करून ते जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मान्यतेप्रमाणे संबंधित रुग्णालयांच्या औषध विक्रेत्याकडे वर्ग करण्यास आदेशित करण्यात येते. यात कुठेही रुग्णांचे नातेवाईक अथवा लोकप्रतिनिधी यांच्या शिफारशीने वाटप होत नाही.

कोविड रुग्णालयांच्या डॉक्टरांद्वारे त्यांच्या रुग्णालयात भरती रुग्णांची तपासणी करून ज्या रुग्णांना रेमडेसिवीर इंजेक्शनची आवश्यकता आहे त्यांना क्रमाने इंजेक्शन बद्दलचे प्रिस्क्रिप्शन देऊन सदरप्रिस्क्रिप्शन आधारे त्या रुग्णालयास संलग्न औषध वितरकाकडे इंजेक्शन प्राप्त करून घेण्यासाठी पाठविण्यात येते. औषध वितरकाने ज्याप्रमाणे डॉक्टरांनी प्रिस्क्रिप्शन दिले आहे त्याच क्रमाने प्रिस्क्रिप्शन धारकास इंजेक्शन देण्यात येते. औषध वितरकांने इंजेक्शन देण्याबद्दलची व रुग्णांची सविस्तर नोंद “परिशिष्ट अ” मध्ये घेवून शासनाने निर्धारित करून दिलेले दर आकारावे. नंतर सदर तपशील दररोज सायंकाळी अन्न व औषध प्रशासन विभागास सादर करावा. अन्न व औषध प्रशासन विभाग जिल्हाधिकारी कार्यालयास सदर तपशील सादर करतील. वरील प्राप्त यादीतील तपशिलाची तपासणी व पडताळणी नियंत्रण कक्षाद्वारे केली जाईल. यासाठी ठराविक रुग्ण व त्यांचे नातेवाईकांशी संपर्क साधला जाईल व खात्री केली जाईल. यासाठी जिल्हा नियंत्रण कक्ष 07172-274161, 07172-274162 संपर्क क्रमांक कार्यान्वीत करण्यात आले असल्याचे जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी कळविले आहे.