अर्थ व सांख्यिकी संचालनालयातर्फे तीन दिवसीय कार्यशाळा

अर्थ व सांख्यिकी संचालनालयातर्फे तीन दिवसीय कार्यशाळा

 

चंद्रपूर, दि. 27 : वार्षिक उद्योग पाहणी हा उद्योगविषयक (संघटित क्षेत्र) महत्वपूर्ण आकडेवारीचा प्रमुख स्त्रोत आहे. या आकडेवारीचा वापर राष्ट्रीय उत्पन्न अंदाज (GDP) तयार करण्यासाठी, औद्योगिक संरचनेचा अभ्यास करण्यासाठी व उद्योगविषयक धोरणे निश्चितीसाठी होतो. राष्ट्रीय स्तरावर सांख्यिकी कार्यालयाकडून देशातील सर्व राज्यांमधील प्रमुख उद्योगांच्या वार्षिक उद्योग पाहणीचे काम करण्यात येते. तर राज्यातील उद्योग पाहणीचे काम अर्थ व सांख्यिकी संचालनालय या राज्य शासनाच्या सांख्यिकी विषयक नोडल यंत्रणेकडून करण्यात येते.

निवड करण्यात आलेल्या उद्योगांना सांख्यिकी संग्रहण अधिनियम 2008 खालील तरतुदींनुसार माहिती देणे बंधनकारक आहे. सन 2021-22 या वर्षाच्या क्षेत्रकामासाठी राज्यातील क्षेत्रीय अधिकाऱ्यांची तीन दिवसीय कार्यशाळा नियोजन विभागाच्या अधिनस्त अर्थ व सांख्यिकी संचालनालय, मुंबई तर्फे यशदा, पुणे येथे आयोजित करण्यात आली होती. कार्यशाळेच्या उद्घाटन कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी यशदाचे महासंचालक एस. चोकलिंगम, तर प्रमुख पाहूणे म्हणून औद्योगिक सांख्यिकी विभागाचे उपमहानिदेशक सौम्या चक्रवर्ती, पुणे येथील क्षेत्रीय कार्यालयाचे संचालक आलोककुमार, उद्योग विभागाचे प्रतिनिधी पी.डी.रेंदाळकर, अर्थ व सांख्यिकी संचालनालयाचे संचालक विजय आहेर उपस्थित होते. या कार्यशाळेत एकूण 164 अधिकारी व कर्मचारी या सहभागी झाले होते.

सौम्या चक्रवर्ती यांनी, जगात बहुतांश देशांमध्ये वार्षिक उद्योग पाहणी घेण्यात येत असल्याचे सांगून आपल्या देशातील वार्षिक उद्योग पाहणीमध्ये सर्वात अधिक उद्योगांची पाहणी केली जात असल्याचे सांगितले. तसेच माहिती विहीत वेळेत संकलित करून त्वरीत उपलब्ध करावी, असेही त्या म्हणाल्या. विजय आहेर यांनी, मनुष्यबळाची कमतरता असली तरी कामाचे योग्य नियोजन करावे. शासनासाठी व उद्योग क्षेत्रासाठी महत्वाची असलेली माहिती या पाहणीच्या माध्यमातून वेळेत व गुणवत्तापुर्ण उपलब्ध करण्याच्या दृष्टीने कार्यवाही करावी. तसेच उद्योगांनी देखिल या कामी आवश्यक ते सहकार्य करावे, असे आवाहन केले.

 

श्री. चोकलिंगम, म्हणाले, देशातील सर्व्हेचा इतिहास, माहितीचे महत्व, त्याचा वापर आणि त्यामुळे होणारे अपेक्षित/अनपेक्षित परिणाम याबाबत उदाहरणांसह ज्ञानात भर घातली. माहिती तंत्रज्ञानात होत असलेल्या नवनवीन प्रगतीद्वारे उपलब्ध होत असलेले आर्टिफिशियल इंटेलिजन्स व मशीन लर्निंग यासारखे तंत्रज्ञान याचा विचार करुन माहिती संकलनाच्या पद्धतीमध्ये देखील सुधारणा होण्याच्या दृष्टीने विचार करण्याची आवश्यकता प्रतिपादन केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपसंचालक दिपाली धावरे यांनी तर आभार सहसंचालक नवेन्दु फिरके यांनी मानले.

 

कार्यशाळेला रणबीर डे, बाप्पा करमरकर, डॉ. प्रदिप आपटे, उपसंचालक श्रीनिवास शिर्के, महेश चोरघडे आदींनी मार्गदर्शन केले. कार्यशाळेच्या दुसऱ्या दिवशी अपर संचालक डॉ. जितेंद्र चौधरी, उपस्थित होते. अर्थ व सांख्यिकी संचालनालयाच्या संबंधित अनुभवी प्रशिक्षकांद्वारे वार्षिक उद्योग पाहणीच्या कामाचे प्रात्यक्षिकासह प्रशिक्षण संगणकावर घेण्यात आले व प्रशिक्षणार्थींच्या अडचणींचे निराकरण करण्यात आले. कार्यशाळेच्या समारोपाच्या कार्यक्रमासाठी यशदाचे उपमहानिदेशक डॉ.मल्लीनाथ कलशेट्टी (भा.प्र.से.), अपर संचालक पुष्कर भगूरकर, उपस्थित होते.