सुक्ष्म नियोजनासह जिल्हयाचा आराखडा बनवावा – जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर

जलयुक्त शिवार अभियान 2.0 कार्यशाळेचे उद्घाटन

सुक्ष्म नियोजनासह जिल्हयाचा आराखडा बनवावा

– जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर

 

भंडारा, दि. 26 : जलयुक्त शिवारच्या दुसऱ्या टप्पयात पुढील दिड महीन्यात जास्तीत जास्त कामांना कृषी,जलसंपदा,वन यांच्यासह अन्य संबंधित यंत्रणांनी सुरवात करावी. जलयुक्त शिवार अभियानाच्या कार्यशाळेत सर्व विभागांनी त्यांच्या कामाविषयीच्या अडचणी, समस्या यासह व्यापक विषयावर मंथन करून हे अभियान यशस्वी करण्याच्या दृष्टीने काम करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी आज कार्यशाळेच्या उद्घाटनाप्रसंगी केले.

 

जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात आयोजित जलयुक्त शिवार अभियान 2.0 कार्यशाळेला कृषी अधिक्षक अधिकारी संगीता माने, उपविभागीय अधिकारी रविंद्र राठोड, कार्यकारी अभियंता जिल्हापरिषद अनंत जगताप, उपवनसंरक्षक श्री.गवई उपस्थित होते.

 

यावर्षी अल निनोच्या भाकीतामुळे व वातावरणातील बदलामुळे पाणी टंचाई निर्माण होऊ शकते. मात्र जलजीवन मिशन अंतर्गत जलस्त्रोतांच्या बळकटीकरणाचे काम हे प्रथम प्राधान्य असावे, असे श्री.कुंभेजकर यांनी सांगितले.

 

यापूर्वी जलयुक्त शिवार अभियानात लोकसहभाग घेतला होता. या टप्यातही भारतीय जैन सकल संघटना व अन्य अशासकीय संघटनाची मदत घेण्यात यावी. प्रत्येक तालुक्यात किमान पाच गावात श्रमदानाने कामे करण्यात यावी असे ही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. एकात्मिक पद्धतीने ग्रामस्थ, शेतकरी तसेच सर्व संबंधित विभागाच्या समन्वयाने नियोजनबद्धरीत्या अंमलबजावणी करून जलयुक्त शिवार कार्यक्रमांतर्गत विविध मृद व जलसंधारणाचे क्षेत्रीय उपचार, जुन्या जलस्त्रोतांचे बळकटीकरण, आवश्यकतेनुसार दुरुस्ती, गाळ काढणे इत्यादी कामे घेऊन त्यांची यशस्वी अंमलबजावणी करून शेतीसाठी संरक्षित सिंचनाची सुविधा निर्माण करणे अपेक्षीत आहे.

 

जलयुक्त शिवार अभियान 1.0 प्रभावीपणे राबविल्यानंतर आता जिल्ह्यातील 100 गावांत जलयुक्त शिवार अभियान 2.0 राबविण्यात येणार आहे. त्यामुळे या गावांतील शेतकऱ्यांच्या जीवनात जलक्रांती होऊन शेती सिंचनासाठी पाणी उपलब्ध होणार आहे.

 

कार्यशाळेच्या उद्घाटकीय कार्यक्रमाची प्रस्तावना जिल्हा कृषी अधिक्षक संगीता माने यांनी केले. या कार्यशाळेत सर्व उपविभागीय कृषी अधिकारी यांनी सादरीकरणाव्दारे कामाच्या नियोजनाची माहिती दिली.

 

या कार्यशाळेला सर्व उपविभागीय अधिकारी, कृषी विभागाचे अधिकारी तसेच जलसंपदा विभागाचे अधिकारी उपस्थित होते. दिवसभर चालणाऱ्या या कार्यशाळेत या अभियानाची यशस्वीतेसाठी चर्चा होणार आहे.