बालगृहातील विद्यार्थी व बालकांनी घेतला ताडोबा सफारीचा अभूतपूर्व आनंद

बालगृहातील विद्यार्थी व बालकांनी घेतला ताडोबा सफारीचा अभूतपूर्व आनंद

 

चंद्रपूर, दि. 25: जिल्हा महिला व बाल विकास कार्यालय व ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प संवर्धन प्रतिष्ठान, चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यातील बालगृहातील बालकांसाठी ताडोबा सफारीचे आयोजन करण्यात आले होते. ताडोबा दर्शन कार्यक्रमासाठी जिल्ह्यातील गडचांदूर, राजुरा, नागभीड व चंद्रपूर येथील बालगृहातील एकूण 35 बालकांनी सहभाग घेतला होता. याप्रसंगी ताडोबा येथे बर्डमॅन श्री. वाघमारे यांच्या नेतृत्वात विद्यार्थ्यांना विविध पक्षी, प्राणी व वन्य प्राण्यांची तसेच त्यांच्या जीवनशैली विषयक माहिती सांगण्यात आली. प्राणी, पक्षी एकमेकांना कोणत्या पद्धतीने विविध परिस्थितीला संबोधतात याविषयी विशेष अभ्यास वर्ग घेण्यात आला.

 

या सफारीदरम्यान वाघ, अस्वल, चित्तळ, हरीण, सांबर, मोर व रानगवा तसेच ताडोबातील इतर प्राणी व पक्ष्यांना मनभरून पाहण्याचा आस्वाद सहभागी विद्यार्थी व बालकांनी घेतला. या सहलीमध्ये जिल्हा महिला व बालविकास अधिकारी दीपक बानाईत व बालकल्याण समिती अध्यक्षा ॲड. क्षमा बासरकर, अमृता वाघ, वसुधा भोंगळे, वनिता घुमे, बाल न्यायमंडळाच्या श्रीमती देशमुख व जिल्हा बाल संरक्षण कक्षाचे कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते.

 

कार्यक्रमाचे आयोजन जिल्हा बाल संरक्षण अधिकारी अजय साखरकर तसेच महिला व बालकल्याण क्षेत्रात सदैव तत्पर असलेले स्वयंसेवी संस्थेचे अध्यक्ष शशिकांत मोकाशे यांनी केले. सहलीच्या यशस्वीकरीता वरोराचे उपविभागीय पोलिस अधिकारी श्री. नोपानी, ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक डॉ. जितेंद्र रामगांवकर, रोटरी क्लबचे श्री. पोटुडे यांचे विशेष सहकार्य लाभले.