मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजनेचा लाभ घ्यावा

मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजनेचा लाभ घ्यावा

 

भंडारा, दि. 21 :शासनाने राज्यातील शहरी व ग्रामीण सुशिक्षीत युवक युवतींची वाढती संख्या व उद्योग व्यवसाय क्षेत्रात राज्यात विविध क्षेत्रात उपलब्ध होत असलेल्या स्वयंरोजगार व रोजगाराच्या नवीन संधी विचारात घेवून चालना देणारी मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम या नावाने महत्त्वाकांक्षी योजना सन 2019-20 पासून राज्यात जिल्हा उद्योग केंद्र व खादी ग्रामोद्योग मंडळ या कार्यालयामार्फत राबविण्यात येत आहे.

 

या योजना कायदेशिररित्या पात्र असणारे उत्पादन व सेवा उद्योग व्यवासायासाठी आहे. योजनेत कुठलेही स्थायी उत्पन्न नसलेले स्थानिक रहीवासी ज्यांचे वय 18 वर्ष पूर्ण अधिकतम मर्यादा 45 वर्ष (अनुसुचित जाती-जमाती , महिला, माजी सैनिक यांच्यासाठी 5वर्ष शिथिल) पात्र राहतील. सदर योजनेसाठी शैक्षणिक पात्रता ही 10 लाखा रुपयेवरील प्रकल्पासाठी 7 वी उत्तीर्ण व 25 लाखरुपयावरील प्रकल्पासाठी 10 उत्तीर्ण अशी आहे. तसेच अर्जदाराने यापूर्वी शासनाच्या कोणत्याही अनुदानावर आधारीत स्वयंरोजगार योजनेचा लाभ घेतलेला नसावा (कोणत्याही योजनेत अनुदान घेतलेले नसावे.

 

या योजनेत अर्जदारांना उत्पादन व्यवसायासाठी (उदा, बेकरी उत्पादन, पशुखादय निर्मिती, फॅब्रिकेशन इ.) 50 लाख रुपयेपर्यंतच्या प्रकल्पासाठी अर्ज करता येईल व सेवा उद्योग व्यवसायासाठी (उदा. सलुन, रिपेअरिंग व्यवसाय, ब्युटीपार्लर इ.) 20 लाख रुपयेपर्यंत अर्ज करता येईल. या योजनेत अनुसचित जाती जमाती / महीला /अपंग /माजी सैनिक / इतर मागास प्रवर्ग/अल्पसंख्यांक/VJNT या प्रवर्गातील अर्जदार शहरी भागासाठी बँकेने मंजुर केलेल्या प्रकल्प किमतीच्या 25टक्के अनुदान व ग्रामिण भागासाठी 35 टक्के अनुदानासाठी पात्र असेल. त्यासाठी त्यांना स्वगुंतवणुक 5 टक्के करावी लागेल. उर्वरीत सर्व प्रवर्गातील अर्जदार हा शहरी भागासाठी 15टक्के व ग्रामीण भागासाठी 25 टक्के अनुदानासाठी पात्र असेल. या यांना 10 टक्के स्वगुंतवणुक करावी लागेल.

 

या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराने maha-cmegp.gov.in वेबसाईटवर ऑनलाईन अर्ज सादर करावा. अर्ज करताना अर्जदारास स्वतः चा फोटो, आधार कार्ड, अधिवास दाखला/शाळा सोडल्याचा दाखला/ जन्म दाखला, मार्कशिट पैन कार्ड, व्यवसायाचा प्रकल्प अहवाल, जातीचा दाखला व वेबसाईट वरुन डाउनलोड करुन पूर्ण भरलेले हमीपत्र (Lindetaking form) ही कागदपत्रे Upload करावी लागतात.

 

जिल्ह्यातील सुशिक्षीत बेरोजगार युवक युवती ज्यांना नवीन व्यवसाय सुरु करावयाचा आहे त्यांनी वरील वेबसाईटवर अर्ज करावा किंवा योजनेबाबत अधिक माहीती घेण्यासाठी जिल्हा उद्योग केंद्र, येथे कार्यालयीन कामाचे दिवशी प्रत्यक्ष भेट दयावी तसेच योजना राबण्यासाठी या कार्यालयाकडुन कोणत्याही खाजगी व्यक्तीची नेमणूक केलेली नाही व योजनेचा लाभ घेण्यात आपली खाजगी व्यक्तीकडून फसवणूक झाल्यास हे कार्यालय जबाबदार राहणार नाही. जिल्हयातील जास्तीत जास्त अर्जदारांनी या योजनेत भाग घ्यावा, असे आवाहन जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक भुवनेश्वर शिवणकर यांनी केले आहे. जिल्हा उद्योग केंद्र , भंडाराच्या ई-मेल आयडी dic.bhanda ra@maharashtra.gov.in असा आहे.