पीएम आवास योजनेअंतर्गत बांधकाम कामगारांना मिळणार घरकुलाचा लाभ

पीएम आवास योजनेअंतर्गत बांधकाम कामगारांना मिळणार घरकुलाचा लाभ

ऑनलाईन नोंदणी आवश्यक

नोंदणीकृत कामगार असल्याचे प्रमाणपत्र आवश्यक

 

चंद्रपूर २० एप्रिल – चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे सर्वांसाठी घरे या संकल्पनेवर आधारित प्रधानमंत्री आवास योजना (शहरी ) राबविण्यात येत असुन चंद्रपूर मनपा हद्दीत ज्या बांधकाम कामगारांकडे स्वतःची जागा नाही अश्या नागरिकांना घरकुलाचा लाभ देण्यात येणार आहे.

प्रधानमंत्री आवास योजेनच्या घटक क्र. ३ अंतर्गत खाजगी भागीदारीद्वारे घरांची निर्मिती करणे या अंतर्गत एमआयएस ऑनलाईन पोर्टल प्रणालीद्वारे बांधकाम कामगारांची नोंदणी केली जाणार आहे. याकरीता लाभार्थ्यांना पीएम आवास योजनेअंतर्गत २.५० लक्ष रुपयांचे व महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कल्याणकारी मंडळ अंतर्गत २ लक्ष रुपयांच्या अनुदानाचा लाभ मिळणार असुन राष्ट्रीयकृत बँकेकडुन कमी दरात व्याजदरात कर्ज उपलब्ध करून घेता येणार आहे.

नव्याने नोंदणी करणाऱ्या बांधकाम कामगारांना प्रथमतः बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळात नोंदणी करणे आवश्यक असुन त्यानंतर मंडळात नोंदणी झाल्याचे प्रमाणपत्र तसेच इतर आवश्यक कागदपत्रे मनपात सादर करावी लागतील. नोंदणी करण्याकरीता कुटुंबातील सर्वांचे आधार कार्ड,इलेक्शन कार्ड,पॅन कार्ड,राशन कार्ड,बीपीएल प्रमाणपत्र,बँक पासबुकची झेरॉक्स,भाडेकरूची करारनामा,भारतात कुठेही पक्के घर नसल्याचे स्वयंघोषणापत्र,उत्पन्नाचा दाखला,पासपोर्ट फोटो,मनपा हद्दीत मालमत्ता नसल्याचे प्रमाणपत्र या दस्तऐवजांसह अर्ज सादर करणे अनिवार्य आहे.

ज्या बांधकाम कामगारांकडे स्वतःच्या मालकीचे घर नाही त्यांना मनपा प्रधानमंत्री आवास योजना कक्ष,मनपा झोन कार्यालय येथे संपर्क साधुन नोंदणी करता येईल तसेच ज्यांनी याआधी नोंदणी केली असेल त्यांना नव्याने नोंदणी करण्याची आवश्यकता नाही.अधिक माहीतीसाठी ९२६५६४०८६२,९८२३००४२८१,७९७२१९३७०५ या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधता येईल.

चंद्रपूर शहरात ज्या नागरीकांकडे स्वतःची जागा नाही व अनेक वर्षांपासुन भाडेकरू म्हणुन वास्तव्यास आहेत अश्या नोंदणीकृत बांधकाम कामगार असलेल्या अधिकाधिक नागरीकांनी या घरकुलांचा लाभ घेण्याचे आवाहन चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे करण्यात येत आहे.