आनंदाचा शिधा मिळाल्याबद्दल लाभार्थ्यांची कृतज्ञता…

आनंदाचा शिधा मिळाल्याबद्दल लाभार्थ्यांची कृतज्ञता

विविध योजनांच्या लाभार्थ्यांशी मुख्यमंत्री श्री. शिंदे यांचा संवाद

 

भंडारा, दि. 13 : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांच्या लाभार्थ्यांशी आज ऑनलाईन संवाद साधला. यावेळी अन्न नागरी पुरवठा विभागाचे मंत्री रविंद्र चव्हाण, सचिव विजय वाघमारे यासह भंडारा जिल्ह्यातील निवडक लाभार्थी जिल्हाधिकारी कार्यालयातून ऑनलाईन सहभागी झाले होते. यावेळी जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर, जिल्हा पुरवठा अधिकारी नरेश वंजारी, जिल्हा पणन अधिकारी अजय बिसने यासह 50 लाभार्थी सहभागी झाले होते.

 

या ऑनलाईन संवादाच्या सुरूवातीला अन्न नागरी पुरवठा विभागाचे मंत्री रविंद्र चव्हाण यांनी आनंदाचा शिधा, शिवभोजन यासह अन्य विषयावर भूमिका मांडली.

 

आनंदाचा शिधा मिळाला असून त्यातील जिन्नस चांगल्या दर्जाचे असल्याचे लाभार्थ्यानी सांगितले. आनंदाचा शिधा संचाचे वितरण, राज्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर राशी (बोनस), शिवभोजन थाळी या योजनांबाबत मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी संवाद साधला. त्यात त्यांनी धान उत्पादकांना बोनस मिळाल्याबाबत विचारणा केली असता लाभार्थ्यानी याबाबत समाधान व्यक्त केले.

 

सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत वितरीत करण्यात येणाऱ्या शिधा जिन्नसांचे वितरण पात्र लाभार्थ्यांना सुरळीतपणे होत आहे का, रास्तभाव दुकानांमार्फत योजनेचा लाभ आदी बाबींवर देखील मुख्यमंत्र्यांनी संवाद साधला.