दस्त नोंदणी करतांना येणाऱ्या अडचणी व नोंदणी अधिनियमाचे सक्षमीकरण करण्याच्या दृष्टीने समिती गठीत

दस्त नोंदणी करतांना येणाऱ्या अडचणी व नोंदणी अधिनियमाचे सक्षमीकरण करण्याच्या दृष्टीने समिती गठीत

Ø सदस्य म्हणून जिल्हाधिकारी विनय गौडा यांचा समितीत समावेश

 

चंद्रपूर, दि. 31: शासन निर्णयाच्या अनुषंगाने नोंदणी अधिनियमाचे कलम 21 व 22 आणि महाराष्ट्र नोंदणी नियम, 1661 चे नियम 44 तसेच दि.12 जुलै 2021 नुसार दस्त नोंदणी करताना सदर कलम, नियम व परिपत्रकाचे पालन करून दस्त नोंदणी करण्याबाबत दुय्यम निबंधकांना येणाऱ्या अडीअडचणी दूर करण्याच्या अनुषंगाने, तसेच नोंदणी अधिनियमाची कलम 21 व 22 चे सक्षमीकरण करण्याच्या दृष्टीने व त्यामधील तरतुदी अधिक परिणाम करण्यासाठी त्यात सुधारणा करण्याच्या अनुषंगाने सर्वकष अभ्यास करून शासनास शिफारशी करण्यासाठी नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करण्यास शासन मान्यता देण्यात आली आहे. या गठीत समितीमध्ये सदस्य म्हणून चंद्रपूरचे जिल्हाधिकारी विनय गौडा जी सी यांचा समावेश आहे.

 

सदर गठीत करण्यात आलेल्या समितीमध्ये अध्यक्ष म्हणून पुणेचे नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक श्रावण हर्डीकर, सदस्य म्हणून नागपूरचे जिल्हाधिकारी डॉ.विपिन इटनकर, चंद्रपूरचे जिल्हाधिकारी विनय गौडा जी सी, सांगलीचे जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी, पुणेचे भूमी अभिलेख उपसंचालक बी.डी. काळे, जिल्हाध्यक्ष भूमी अभिलेख कमलाकर हत्तेकर,पालघरचे सह जिल्हा निबंधक वर्ग-1 तथा मुद्रांक जिल्हाधिकारी उदयराज चव्हाण, पुणे विभाग पुणेचे सह जिल्हा निबंधक वर्ग-2 तथा प्रशासकीय अधिकारी, नोंदणी उपमहानिरीक्षक व मुद्रांक उपनियंत्रक संतोष हिंगाणे तर सदस्य सचिव म्हणून नोंदणी उपमहानिरीक्षक व मुद्रांक उपनियंत्रक (संगणक) दीपक सोनवणे यांचा गठीत करण्यात आलेल्या समितीमध्ये समावेश करण्यात आला आहे.

 

सदर समितीची पहिली सभा 6 एप्रिल 2023 रोजी नोंदणी महानिरीक्षक कार्यालयात सकाळी 11 वाजता आयोजित करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी नागपूर, चंद्रपूर व सांगली यांना प्रत्यक्ष उपस्थित राहता येत नसल्याने ते ऑनलाइन उपस्थित राहू शकतील. याबाबतची लिंक 5 एप्रिल रोजी पाठवण्यात येणार आहे. असे पुण्याचे नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक श्रावण हर्डीकर यांनी कळविले आहे.