राष्ट्रीय जंतनाशक मोहिमेतंर्गत जिल्हयातील 4 लाखापेक्षा अधिक मुलांना गोळया देण्याचे उद्दिष्ट

राष्ट्रीय जंतनाशक मोहिमेतंर्गत जिल्हयातील

4 लाखापेक्षा अधिक मुलांना गोळया देण्याचे उद्दिष्ट

चंद्रपूर दि. 27 एप्रिल : जागतिक आरोग्य संघटनेच्या अंदाजानुसार भारतात 1 ते 19 वर्ष वयोगटातील अनेक मुलांना आतडयामध्ये वाढणा-या परजीवी जंतापासून धोका आहे. याचे प्रमुख कारण म्हणजे, वैयक्तिक व परिसर स्वच्छतेचा अभाव असणे हा आहे.  या कृमीदोषाचा संसर्ग दुषित मातीच्या संपर्कात आल्यामुळे सहजतेने होतो. त्यामुळे मातीतून प्रसार होणाऱ्या कृमीचा प्रादुर्भाव रोखणे हा मुख्य उद्देश आहे.

बालकांमध्ये होणारा दीर्घकालीन कृमीदोष हा व्यापक व मुलांना कमजोर करणारा आहे. कृमीदोष हा रक्तक्षय आणि कुपोषणाचे कारण तर आहेच सोबतच बालकाची बौध्दिक व शारिरीक वाढ खुंटण्याचेही कारण ठरते. त्याअनुषंगाने केंद्र व राज्यशासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार चंद्रपूर जिल्हयात 25 एप्रिल 2022 पासून  संस्था स्तरावर शाळेमध्ये राष्ट्रीय जंतनाशक दिन मोहीम व 29 एप्रिल 2022 रोजी मॉप अप दिन राबविण्यात येत आहे.

दि. 25 एप्रिल ते 2 मे 2022 पर्यंत समुदायस्तरावर अंगणवाडी केंद्रात राष्ट्रीय जंतनाशक दिन मोहीम राबविण्यात येईल. जंतनाशक मोहिमेत जिल्हयात ग्रामिण भागातील एकूण 2565 अंगणवाडी केंद्रातील 1,33,688 मुलांना, शहरी भागातील एकुण 151 अंगणवाडी केंद्रातील 12,830 मुलांना व महानगरपालिका क्षेत्रातील एकूण 155 अंगणवाडी केंद्रातील 2803 मुलांना गोळया खाऊ घालण्यात येणार आहे. तर जिल्हयात ग्रामिण भागातील 1898 शासकिय अनुदानीत व खाजगी शाळेतील 2,29,399 मुलांना,  शहरी भागातील एकुण 247 शाळातील 62,987 मुलांना व महानगरपालिका क्षेत्रातील 108 शाळेतील 43,250 मुलांना गोळया खाऊ घालण्यात येणार आहे. याप्रमाणे राष्ट्रीय जंतनाशक दिन मोहिमेत जिल्ह्यातील ग्रामीण, शहरी व महानगरपालिका क्षेत्रातील एकूण 4,84,959 मुला-मुलींना जंतनाशक गोळया देण्याचे उद्दिष्ट आहे.

राष्ट्रीय जंतनाशक दिनाचा उद्देश हा 1 ते 19 वर्षे वयोगटातील सर्व मुला-मुलींना शाळा व अंगणवाडी केंद्र स्तरावर जंतनाशक गोळी देऊन त्यांचे आरोग्य चांगले ठेवणे, पोषण स्थिती, शिक्षण व जीवणाचा दर्जा उंचावणे हा आहे.

सदर मोहिम सर्व शासकीय अनुदानित शाळा, आश्रम शाळा, महानगरपालिका व सर्व खाजगी अनुदानित, सर्व खाजगी विनाअनुदानित शाळा, आर्मी स्कुल, सीबीएसई स्कुल, नवोदय विद्यालय, सुधारगृह, सर्व खाजगी इंग्रजी माध्यमिक शाळा, मदरसे, मिशनरी स्कुल, गुरुकुल, संस्कार केंद्र, सर्व कनिष्ठ महाविद्यालय, व वरिष्ठ महाविद्यालयाचे प्रथम वर्षाचे विद्यार्थी, नर्सिग कॉलेज, आय.टी.आय, पॉलीटेक्निक, इंजिनिअरिंग, कला, वाणिज्य व विज्ञान, फार्मसी महाविद्यालय, डी.एड.महाविद्यालय व सर्व ग्रामीण, शहरी अंगणवाडी व मिनी अंगणवाडी केंद्रात राबविण्यात येत आहे. तरी, जिल्हयातील नागरीकांनी या मोहिमेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.