एप्रिल : हिवताप जनजागृती महिना म्हणून राबविण्याच्या सुचना

एप्रिल : हिवताप जनजागृती महिना म्हणून राबविण्याच्या सुचना

चंद्रपूर, दि. 12 एप्रिल : हिवताप निर्मूलनासाठी उपचाराबरोबरच प्रतिबंध देखील महत्त्वाचा आहे. हिवताप निर्मूलनासाठी नागरिकांचाही सहभाग महत्त्वाचा असून राष्ट्रीय किटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत दरवर्षी 25 एप्रिल हा दिवस जागतिक हिवताप दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. या पार्श्‍वभूमीवर हिवतापाविषयी नागरिकांमध्ये जनजागृती निर्माण होऊन प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या अंमलबजावणीमध्ये नागरिकांचा सक्रिय सहभाग करून घेण्यासाठी केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार संपूर्ण एप्रिल महिना हा हिवताप जनजागृती महिना म्हणून राबविण्यात येत आहे.

हिवताप हा प्लासमोडियम नावाच्या परोपजीवी जंतूमुळे होणारा आजार आहे. हा आजार बाधित मादा ॲनाफिलीस डासांच्या चावण्यामुळे पसरतो. या डासाची उत्पत्ती स्वच्छ साचलेले पाणी, पाण्याचे हौद, पावसाळी पाण्याचे डबके, भात शेतातील पाणी, कॅनलमधील पाणी व नदीपात्रातील खड्ड्यांमध्ये साचलेल्या पाण्यामध्ये होते. हिवताप झालेल्या रुग्णाला थंडी वाजून ताप येतो, डोकेदुखी, मळमळ, उलटी, अंगदुखी आदी लक्षणे दिसून येतात. भारतात हिवतापाचे मुख्यत: दोन प्रकार आढळून येतात. प्लासमोडियम फॅलसीपॅरम व प्लासमोडियम व्हायव्हॅक्स. ही लक्षणे आढळून येणाऱ्या रुग्णाने आपला रक्त नमुना आरोग्य कर्मचाऱ्यांकडून किंवा आरोग्य संस्थेत जाऊन तपासून घेणे अत्यावश्यक असते. तपासणीअंती रक्त नमुना हिवतापाकरीता दूषित आढळून आल्यास आरोग्य कर्मचाऱ्यांमार्फत सदर रुग्णास औषधोपचार करण्यात येतो. हा उपचार रुग्णाने पूर्ण करुन घेणे गरजेचे असते. वेळेवर निदान झाल्यास किंवा उपचार पूर्ण न केल्यास रुग्णाचा मृत्यू होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

हिवताप प्रतिबंधक करण्याकरीता गावाच्या किंवा घराच्या सभोवताली असलेली डबकी, खड्डे बुजवावेत, गटर, नाल्या वाहत्या कराव्यात, इमारतीच्या टाक्या, हौद यांना घट्ट झाकण बसवावे.  फ्रीज, कूलर, कुंड्या, डब्बे व अन्य वस्तूमध्ये सात दिवसांपेक्षा जास्त काळ पाणी साचून राहणार नाही याची काळजी घ्यावी. गप्पी माशांचा वापर करावा. घराच्या खिडक्यांना जाळ्या बसवाव्यात. झोपताना मच्छरदाणीचा वापर करावा. डास विरोधी मलम किंवा अगरबत्तीचा वापर करावा. पूर्ण बाह्याचे कपडे घालावेत जेणेकरून आपली डास चावण्यापासून सुरक्षा व हिवताप होण्यापासून रक्षण होईल. हिवतापाच्या निर्मूलनासाठी आरोग्य विभागासोबतच पंचायत विभाग, पाणीपुरवठा विभाग, ग्रामविकास विभाग, महिला व बालकल्याण विभाग, शिक्षण विभाग आदी विभागांनी समन्वय साधून काम करणे अत्यावश्यक आहे.

सदर मोहीम चालू होण्यापूर्वी जिल्ह्यात कार्यरत वैद्यकीय अधिकारी तसेच समुदाय आरोग्य अधिकारी यांचे हिवतापाबाबत एक दिवसीय प्रशिक्षण सत्र घेण्यात आले. या जनजागृती मोहिमेअंतर्गत जिल्ह्यातील आरोग्य कर्मचाऱ्यांमार्फत दैनंदिन विविध उपक्रम राबविण्यात येत आहे. या मोहिमेत आरोग्य कर्मचारी, तापरुग्ण सर्वेक्षण करून डासाची उत्पत्ती थांबविण्याबाबत उपाययोजना करीत आहे. त्यासोबतच गावामध्ये रॅली, सभा व शाळेच्या मुलांना याबाबत माहिती अवगत करण्यासाठी सभा आयोजित केल्या जात असून डास अळ्या व गप्पी मासे शाळेत आणि गावामध्ये प्रदर्शनाद्वारे दाखवण्यात येत आहे.

हिवताप हा आजार रोखण्याकरीता आरोग्य विभागाने सुचविलेल्या उपाययोजनांचे नागरिकांनी काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. प्रतिक बोरकर यांनी केले आहे.