वनपट्टे प्राप्त असणाऱ्या आदिवासी शेतकऱ्यांना शेळी गटाचा पुरवठा करण्याकरीता अर्ज आमंत्रित

वनपट्टे प्राप्त असणाऱ्या आदिवासी शेतकऱ्यांना

शेळी गटाचा पुरवठा करण्याकरीता अर्ज आमंत्रित

चंद्रपूर, दि. 7 एप्रिल : वनहक्क कायदा 2006 अंतर्गत वनपट्टे प्राप्त असणाऱ्या आदिवासी शेतकऱ्यांना शेळीगटाचा पुरवठा करणे ही योजना मंजूर आहे. वनहक्क कायद्याद्वारे जमिनी प्राप्त असणाऱ्या आदिवासी शेतकऱ्यांना शेतीस पूरक व्यवसाय म्हणून 10 शेळ्या व 1 बोकड पुरवठा करून शेळीपालन व्यवसायाची जोड देणे व त्यांचे जीवनमान उंचावणे या दृष्टिकोनातून अनुसूचित जमातीच्या वनपट्टेधारक शेतकऱ्यांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.

वनपट्टे धारक शेतकऱ्यांना पात्रतेचे निकष :

लाभार्थी हा अनुसूचित जमातीचा वनपट्टे धारक शेतकरी असावा. वनपट्टे धारक लाभार्थीकडे वनपट्टा प्राप्त 7/12 किंवा प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. तसेच शेळ्यांना पिण्याच्या पाण्याची उपलब्धता असणे आवश्यक राहील. वनपट्टे धारक लाभार्थी अथवा त्यांच्या कुटुंबातील इतर सदस्यांनी यापुर्वी या योजनेचा लाभ आदिवासी विकास अथवा अन्य विभागामार्फत घेतला नसल्याबाबतचे संबंधित ग्रामपंचायतीचे ना हरकत प्रमाणपत्र जोडणे आवश्यक राहील. वनपट्टेधारक शेतकऱ्यांनी रहिवासी दाखला, आधार कार्ड, जातीचे प्रमाणपत्र, उत्पन्न प्रमाणपत्र बँकेचे पासबुक अर्जासोबत जोडावे.

पात्रतेचे निकष पूर्ण करीत असलेल्या वनपट्टेधारक शेतकऱ्यांना या प्रकल्पाअंतर्गत चंद्रपूर, बल्लारपूर, राजुरा, जिवती, कोरपना, पोंभूर्णा, गोंडपिंपरी, मूल, सिंदेवाही  व सावली तालुक्यातील अधिवास असलेल्या अनुसूचित जमातीच्या वनपट्टे धारक लाभार्थ्यांनी परिपूर्ण कागदपत्रांसह अर्ज एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, चंद्रपुर या कार्यालयात सादर करावा. असे सहाय्यक जिल्हाधिकारी तथा एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाचे प्रकल्प अधिकारी रोहन घुगे यांनी कळविले आहे.