6 ते 16 एप्रिलपर्यंत जिल्ह्यात सामाजिक समता सप्ताह

6 ते 16 एप्रिलपर्यंत जिल्ह्यात सामाजिक समता सप्ताह           

चंद्रपूर दि. 7 एप्रिल : भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131 व्या जयंतीनिमित्त सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत 6 ते 16 एप्रिल या कालावधीत जिल्ह्यात सामाजिक समता सप्ताह कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. या निमित्ताने शोषित, वंचित, पिडीत घटकांपर्यंत पोहचून संपुर्ण जिल्हयात विविध उपक्रम राबविण्याचे नियोजन करण्यात आल्याची माहिती समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त अमोल यावलीकर यांनी दिली.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताहाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाला समाजकार्य महाविद्यालयाचे डॉ. सुभाष गिरडे, सहाय्यक लेखाधिकारी बुर्लावार, समाजकल्याण निरीक्षक मनोज माकोडे, जिल्हा प्रकल्प अधिकारी सचिन फुलझेले आदी उपस्थित होते.

जिल्ह्यात 6 ते 16 एप्रिल या कालावधीत सामाजिक समता कार्यक्रमनिमित्त कार्यक्रमांची माहिती देणे, विभागातील सर्व महाविद्यालय, आश्रमशाळा, शासकीय वसतीगृह, निवासी शाळा येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचारावर आधारीत वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा, लघुनाट्य स्पर्धा आदींचे आयोजन करणे, जिल्हा व विभागीय स्तरावर कार्यक्रमांचे आयोजन करून स्वाधार योजना, शिष्यवृत्ती, मिनी ट्रॅक्टर लाभार्थ्यांना प्रतिनिधीक स्वरुपात वाटप करणे, जेष्ठ नागरिकांचे जनजागृती शिबिर व नागरिकांचा मेळावा घेणे.

आरोग्य विभागाच्या सहाय्याने विभागातील सर्व महाविद्यालय, आश्रमशाळा, शासकीय वसतिगृह, निवासी शाळा येथे रक्तदान शिबिराचे आयोजन, समता दुतांमार्फत ग्रामीण व शहरी भागात पथनाटय व लघुनाटिका याद्वारे सामाजिक न्याय विभागाच्या विविध योजनांबाबत जनजागृती करणे, समाज कल्याण यांचेमार्फत प्रत्येक जिल्हयात मार्जिन मनी योजनेंतर्गत कार्यशाळा आयोजित करणे, मार्जिन मनी योजनेचा लाभ घेतलेल्या लाभार्थ्यांची कार्यशाळा आयोजित करणे, संविधान जागर जनजागृतीसाठी कार्यक्रम आयोजित करणे, जिल्हास्तरावर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजनेंतर्गत बाबासाहेबांनी शेतकऱ्यांसाठी केलेल्या कार्याबद्दल माहिती सांगणारे व्याख्यान आयोजित करणे, विभागातील सर्व जिल्हा जात पडताळणी कार्यालयात ऑनलाईन जात पडताळणी प्रमाणपत्र प्रदान करणे, तृतीयपंथी व्यक्तीमध्ये जनजागृती व ओळखपत्र वाटप कार्यक्रम, ग्रामीण व शहरी भागातील अनुसूचित जाती व नवबौध्द वस्त्यांमध्ये स्वच्छता करणे आदी कार्यक्रमांचा समावेश आहे.

वरील सर्व कार्यक्रम सहाय्यक आयुक्त कार्यालय, जि.प. समाज कल्याण अधिकारी कार्यालय, डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था, बार्टी पुणे अंतर्गत चंद्रपूर जिल्हा प्रकल्प यांच्या समन्वयातून होणार असल्याचे सहाय्यक आयुक्त अमोल यावलीकर यांनी सांगितले