जिल्हाधिकाऱ्यांनी केली महाकाली मंदिर परिसराची पाहणी Ø विविध विभागांना सज्ज राहण्याचे दिले निर्देश

जिल्हाधिकाऱ्यांनी केली महाकाली मंदिर परिसराची पाहणी

Ø विविध विभागांना सज्ज राहण्याचे दिले निर्देश

चंद्रपूर दि. 5 एप्रिल: चंद्रपूर शहरातील चैत्र पौर्णिमेनिमित्त सुप्रसिद्ध आणि ऐतिहासिक महाकाली यात्रा दि. 7 एप्रिल पासून सुरू होत आहे. या यात्रेदरम्यान माता महाकालीच्या दर्शनासाठी महाराष्ट्रातील तसेच इतर राज्याबाहेरून भाविक मोठ्या संख्येने दर्शनासाठी येतात. यासाठी जिल्हा प्रशासनाकडून आवश्यक त्या उपाययोजना, नियोजन व अंमलबजावणी करण्याकरीता जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी शहरातील महाकाली  मंदिराला भेट देऊन परिसराची पाहणी केली. यावेळी जिल्हा पोलिस अधिक्षक अरविंद साळवे, मनपा आयुक्त राजेश मोहिते, निवासी उपजिल्हाधिकारी विशालकुमार मेश्राम, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी किरण मोरे व मंदिराचे विश्वस्त उपस्थित होते.

            विविध विभागांना सज्ज राहण्याचे निर्देश : यात्रेत निरनिराळ्या अशासकीय व सेवाभावी संस्थेतर्फे भोजनदान व इतर खाद्यपदार्थ, महाप्रसाद वाटप केले जाते.याकरीता योग्य जागेची निवड करून त्या ठिकाणी स्टॉल लावावे. सदर खाद्यपदार्थ अन्न व औषध प्रशासन विभागाकडून तपासणी करूनच वाटप करण्यात येईल, याची दक्षता घ्यावी. वाहतुकीस अडचण निर्माण होणार नाही, यासाठी उपाययोजना कराव्या. भाविकांना दर्शनाकरीता प्रत्यक्ष गाभाऱ्यात न जाऊ देता बाहेरूनच दर्शनाची व्यवस्था करावी. स्वयंसेवकांना ओळखपत्र देण्यात यावे व सदर स्वयंसेवकांची यादी विश्वस्त मंडळाने पोलीस विभागास उपलब्ध करून द्यावी.

महाकाली विश्वस्त मंडळांने तक्रार निवारण कक्ष तयार करावे. आपत्कालीन परिस्थितीत विद्युत पुरवठा खंडित झाल्यास भाविकांची गैरसोय टाळण्याकरीता जनरेटरची व्यवस्था करावी. तसेच यात्रेकरूकरीता पिण्याच्या थंड पाण्याचे स्टॉल लावावेत. मंदिर परिसरात अग्निशमन यंत्र लावावे, अशा सूचना जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी महाकाली मंदिर विश्वस्त मंडळाला दिल्या.

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळाने परिवहन बसेस रस्त्याच्या कडेला थांबणार नाही याची दक्षता घ्यावी. बसेसचे वेळापत्रक मुख्य ठिकाणी तसेच मंदिर परिसरात लावण्यात यावे. अंचलेश्वर गेट परिसरातील बसस्थानकात बस थांबा न देता शिवाजी चौक येथे बस थांबा देण्यात यावा यावर सर्वकष विचार करून योग्य निर्णय घ्यावा. उपप्रादेशिक परिवहन विभागाने यात्रा परिसरात अवैध प्रवासी वाहतूक होणार नाही, याची दक्षता घ्यावी.

महानगर पालिकेने मंदिर परिसरातील भिंतीला लागून असलेल्या जागेची आखणी करून दुकाने लावण्याकरीता दुकान धारकांची रीतसर नोंदणी करावी. पिण्याच्या पाण्याच्या नळाची व्यवस्था करून पाणी 24 तास सुरळीत सुरू ठेवण्याची दक्षता घ्यावी. तसेच महाकाली मंदिर परिसरात साफसफाई व स्वच्छता ठेवावी. वेळोवेळी कचरा उचलण्यासाठी सफाई कामगार नियुक्त करावे व जास्तीत जास्त कचरापेटी मंदिर परिसरात उपलब्ध ठेवाव्यात. नदीच्या काठावर तसेच यात्रा परिसरात लाईटची व्यवस्था करावी. अग्निशामक सेवा 24 तास यात्रा परिसरात ठेवावी. यात्रा परिसरात तात्पुरते आपत्कालीन मदत केंद्र उभारावे. यात्रा परिसरात नियंत्रण कक्षात लाऊड स्पीकर व सीसीटीव्ही कॅमेऱ्याची व्यवस्था करावी. पार्किंगची व्यवस्था ठेवावी. भाविकांकरीता प्रसाधनाची व स्वच्छता गृहाची व्यवस्था करण्यात यावी. तसेच मंदिर परिसरात आरोग्य पथक गठित करावे. आवश्यक औषधोपचारासह ॲम्ब्युलन्स उपलब्ध ठेवावी तसेच जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सक व महानगरपालिका प्रशासनाने संयुक्तपणे सदर कार्यवाही करावी.

महावितरण विभागाने त्यांच्याकडे उपलब्धअसलेले अग्निशामक सेवा गरज पडल्यास महानगरपालिका प्रशासनास उपलब्ध करून देण्याकरीता वाहनचालकांसह अग्निशामक वाहन तत्पर ठेवावे. यात्रेच्या कालावधीत यात्रा परिसरात आपत्ती व्यवस्थापन पथक कार्यरत ठेवावे. मनपा, पोलीस विभाग, मंदिर प्रशासन, वाहतूक पोलीस निरीक्षक, विजनिर्मिती विभाग यांनी यात्रेपूर्वी संयुक्त तपासणी करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी दिले.