पक्ष्यांच्या संवर्धनासाठी राजाश्रय मिळण्याची गरज;हंसराज अहिर यांचे प्रतिपादन

पक्ष्यांच्या संवर्धनासाठी राजाश्रय मिळण्याची गरज

राष्ट्रीय मागासवर्गीय आयोग अध्यक्ष हंसराज अहिर यांचे प्रतिपादन

चंद्रपूर । घराच्या परिसरातील झाडांवर, रानावनात, टेकड्यांवर अनेक पक्षी आपले लक्ष वेधून घेतात. काही जण घरट्यांमुळे ओळखले जातात. निसर्गाचा एक अविभाज्य भाग असलेल्या या पक्ष्यांचे जीवन शास्त्र जाणून घेण्याची संधी या संमेलनाच्या निमित्ताने पक्षीप्रेमींना उपलब्ध झाली आहे. अनेक वर्ष झालीत कावळ्याचा आवाज ऐकला नाही. देशातून पक्षी संपत आहेत. ते वाचविण्यासाठी राजाश्रय मिळण्याची गरज आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष, माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांनी केले.

 

महाराष्ट्र पक्षिमित्र संयोजित, इको प्रो संस्था आयोजित व ताडोबा- अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या सहकार्याने वन अकादमी येथे पार पडलेल्या 35 व्या पक्षिमित्र संमेलनाच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते.

 

यावेळी मंचावर स्वागताध्यक्ष आमदार किशोर जोरगेवार, संमेलन अध्यक्ष राजकुमार जोब, महाराष्ट्र पक्षीमित्रचे अध्यक्ष जयंत वडतकर, सातपुडा फाउंडेशनचे अध्यक्ष किशोर रिठे, ताडोबाचे उपसंचालक नंदकिशोर काळे, स्वानंद सोनी, सहायक वनसंरक्षक बापू येडे, सार्ड संस्थेचे अध्यक्ष भाविक येरगुडे, इको प्रो अध्यक्ष बंडू धोतरे यांची उपस्थिती होती. स्मृतिचिन्ह देऊन मान्यवरांच्या स्वागत करण्यात आले. त्यानंतर महाराष्ट्र पक्षीमित्रचे अध्यक्ष जयंत वडतकर यांनी दोन दिवसीय संमेलनाचा आढावा घेतला.

 

यावेळी बोलताना माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर म्हणाले, हिंदू संस्कृतीत प्राणी आणि पक्षी हे देवांचे वाहन म्हणून मान आहे. भारतीय निसर्ग आणि त्यात राहणार्‍या प्राण्यांचे रक्षण करण्याचा संदेश देण्यात आला आहे. त्यामुळे पक्ष्याची हिंसा करू नये, असे आवाहन केले. वरोरा भागात कोळसा खाणीसाठी भूसंपादन झाल्याने माळढोक कमी झाले. दुर्गापूर भागात जेव्हा वीज केंद्र आणि कोळसा खाण आल्यानंतर प्रदूषण वाढ आणि तापमान वाढल्याने पक्षी मृत्युमुखी पडतात. ही स्थिती बदल्यांची गरज आहे. केंद्र सरकारकडे पक्षीमित्रांच्या मागण्या पोहोचविण्याचे आश्वासन त्यांनी दिले.

 

स्वागताध्यक्ष आमदार किशोर जोरगेवार म्हणाले, संस्कृती, सांस्कृतिक वैभव, ऐतिहासिक वास्तू आणि उपक्रम यामुळे गावाची ओळख निर्माण होते. चंद्रपूर शहराला या सर्व बाबींचा वारसा लाभला आहे. पशु- पक्षी हे निसर्गाची देणगी आहे. ते वाचले पाहिजे यासाठी प्रयत्न झाले पाहिजे. विधिमंडळात सुरु असलेल्या उन्हाळी अधिवेशनात या संमलेनाचा आढावा अहवाल सादर करू, असे आश्वासन दिले.

 

यावेळी मान्यवरांच्या हस्ते वर्धा येथून पायी आलेले किशोर वानखेडे, वर्धा येथून सायकलने आलेले जेपी शेट्टी, दिलीप विरखडे, विविध पक्ष्यांचा हुबेहूब आवाज काढणारे ताडोबा येथील सुमेध वाघमारे यांचा सत्कार करण्यात आला. या संमेलनाच्या निमित्ताने घेण्यात आलेल्या पक्षी छायाचित्र स्पर्धेचे पुरस्कार वितरण करण्यात आले. या पुरस्कारात प्रथम क्रमांक शुभम टेकाम, द्वितीय अविनाश भगत, तृतीय पुरस्कार चिन्मय जांभुळे, उत्तेजनार्थ पुरस्कार ज्ञानेश्वर गिरण, रोहित बेलसरे, ओम गजुलवार यांचा समावेश आहे. छायाचित्र प्रदर्शनासाठी सहकार्य केल्याबद्दल देवानंद साखरकर यांचा सत्कार करण्यात आला. समारोपीय कार्यक्रमाचे संचालन योगेश दुधपचारे यांनी तर आभार बंडू धोतरे मानले.