कमलापुर शासकिय हत्ती कॅम्प येथे असलेल्या सोयीसुविधा व व्यवस्थापनाबाबत

कमलापुर शासकिय हत्ती कॅम्प येथे असलेल्या सोयीसुविधा व व्यवस्थापनाबाबत

गडचिरोली, दि.08:- कमलापुर शासकिय हत्ती कॅम्प गडचिरोली वनवृत्तातील सिरोंचा वनविभागात स्थित आहे. कमलापुर वनपरिक्षेत्रात सदर शासकिय हत्ती कॅम्प सन 1962 पासून कार्यरत आहे. गडचिरोली जिल्हा मुख्यालयापासून सदर कॅम्प 150 कि.मी.अंतरावर आहे तसेच चंद्रपुर पासुन 170 कि.मी.अंतरावर आहे. त्यामध्ये सध्यास्थितीत 02 नर आणि 06 मादी असे एकूण 08 हत्तीचे वास्तव्य आहे. कॅम्प मधील हत्ती बंदिस्त नसुन बहुतांश वेळी जंगलात चराई करतात. रोज दुपारच्या वेळेस खाद्य देण्यासाठी महावत व चाराकटर यांच्याद्वारे कॅम्प मध्ये आणले जातात. त्याचवेळी बहुतांश पर्यटक हत्ती कॅम्प ला भेट देतात. त्यानंतर पुन्हा सर्व हत्ती जंगलात चराईसाठी मुक्त असतात. कमलापुर हत्ती कॅम्प अहेरी तालुक्यात असुन सदर भाग नक्षलग्रस्त आहे. माहे डिसेंबर 2019 मध्ये नक्षलवाद्यांनी कमलापुर हत्ती कॅम्प ची तोडफोड करुन वनविभागाने पर्यटनाकरिता केलेल्या सुविधा व सौदर्यीकरणाची मोठ्या प्रमाणात नासधुस करुन शासन मालमत्तेचे नुकसान केलेले आहे.

कमलापुर हत्ती कॅम्पमधील नवजात पिल्लु मृत पावलेल्या घटनेबाबत :- हत्ती कॅम्प मधील मंगला (32 वर्षीय) मादा गर्भधारणा झाली होती व जाने-2023 ते फेब्रु-2023 दरम्यान प्रसुती होईल असा अंदाज होता. त्याप्रमाणे पशु वैद्यकिय अधिकारी (LDO) हे कॅम्प येथे भेट देत होते. कॅम्प येथील कर्मचारी/अधिकारी ही सतत पशु वैद्यकिय अधिकारी यांचे संपर्कात होते व सदर हत्तीणीवर लक्ष देवून होते. पशु वैद्यकिय अधिकारी यांचे तपासणी नुसार सदर हत्तीणीची प्रकृती चांगली होती. प्रसुती पर्यंत सदर मादा हत्तीणी मध्ये कोणतेही अनुचित लक्षणे अथवा आजारी असल्याचे लक्षणे दिसली नव्हती. दिनांक-27.02.2023 रोजी सकाळी महावत व चाराकटर हत्तीना आणायला जंगलात गेले असता रात्रीच्या वेळी कमलापुर वनपरिक्षेत्रातील वनखंड क्रमांक-126 च्या नाल्यामध्ये मंगला नामक मादी हत्तीणने पिल्लाला जन्म दिला परंतु ते नवजात पिल्लु मृत असल्याचे दिसले व शेजारी मंगला हत्तीण उभी होती. कमलापुर शासकिय हत्ती कॅम्प मधील हत्ती हे बंदिस्त नाही. तसेच हत्तीण प्रसुतीचे वेळी सोबत असलेल्या हत्तींचे समुहातुन स्वतःला एकटी करुन घेत असते आणि नैसर्गिकरित्या प्रसुती होत असते. या अगोदरच्या सर्व प्रसुती अशाच झालेल्या आहेत याबाबत नोंद घ्यावी.

सदर घटनेची दखल घेत मृत पिल्लाचे शवविच्छेदन करण्यासाठी ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प,चंद्रपुर चे पशु वैद्यकिय अधिकारी आणि मुलचेराचे पशुधन विकास अधिकारी यांना पाचारण करण्यात आले. शवविच्छेदनाचे प्राथमिक अहवालावरुन EEHV (Elephant Endotheliotropic Herpes Virus) ची शक्यता वर्तवली आहे. तपासणी साठी अवयवांचे नमुने गोळा केले आहेत व WRTC (Wildlife Research and Training Center) गोरेवाडा- नागपुर येथे पाठविले आहे. तसेच नमुने वायनाड व जबलपुर येथील प्रयोगशाळांमध्ये पाठविण्यात येतील. सध्यास्थितीत मंगला हत्तीणीची प्रकृती चांगली आहे व तिच्यावर बारीक लक्ष ठेवले जात आहे. या अगोदर माहे-ऑगस्ट 2021 मध्ये सई नामक मादा (2 वर्ष 8 महिने) व अर्जुन नामक नर (2 वर्ष 7 महिने) यांचाही मृत्यु EEHV यामुळे झाला असल्याचे निदान झाले होते. मृत्यू अगोदर हत्तीमध्ये आजारी असल्याची कोणतीही लक्षणे दिसले नव्हती व अकस्मात मृत्यु झाला असल्याचे त्यावेळेसच्या अहवालावरुन दिसते. वरिल घटनांनंतर वैद्यकिय उपाययोजना करण्यात आल्या होत्या व हत्तींची नियमित तपासणी केली जात होती. हरपिस व्हायरस हे जगातील हत्तीचे मृत्युच्या कारणांमधील प्रमुख कारण आहे. सदर विषाणु ची लागण झाल्यानंतर अतितिव्र लक्षणे दिसून 8 ते 24 तासामध्ये मृत्यु ओढावू शकतो. हा आजार प्रामुख्याने हत्तीच्या पिल्लांमध्ये आढळतो. सदर विषाणू करिता लस (Vaccine) नाही. हरपिस विषाणू पासुन बचावासाठी हत्तींची नियमित तपासणी व आजाराचे लक्षणावर बारीक निगराणी,तसेच लक्षणे दिसल्यास त्यावर तात्काळ उपचार हा उपाय आहे व ते हत्ती कॅम्प येथे नियमित केले जात आहे.

कमलापुर हत्ती कॅम्पमधील कर्मचारी यांची माहिती:- सध्यास्थितीत कमलापुर शासकिय हत्ती कॅम्प येथे आलापल्ली वनविभागाकडून सेवावर्ग झाल्यानंतर 5 महावत व 4 चाराकटर असे 9 स्थायी कर्मचारी आहेत. यातील 3 महावत 10 वर्षांपासून कार्यरत आहे,1 महावत 30 वर्षांपासून कार्यरत आहे,1 महावत 14 वर्षांपासून कार्यरत आहे. 4 चाराकटर 10 वर्षापासून कार्यरत आहे. त्याबरोबरच कमलापुर गावातील 10 हंगामी वनमजुर त्यांना कामात मदत करत आहेत.वरिलप्रमाणे प्रत्येक हत्तीमागे 2 कर्मचारी उपलब्ध आहेत.वरिलप्रमाणे कर्मचाऱ्यांना हत्ती साभाळण्याचा दिर्घ अनुभव आहे.अद्ययावत प्रशिक्षण देण्यासाठी वनविभागाकडून प्रयत्न चालू आहेत. सदर कॅम्पचे काम सबंधित नियतक्षेत्राचे वनरक्षक व वनपाल हे पाहतात व शासकिय हत्ती कॅम्पचे व्यवस्थापन वनपरिक्षेत्र अधिकारी,कमलापुर हे पार पाडतात.

कमलापुर कॅम्प येथील हत्तींच्या व्यवस्थापनासाठी वैद्यकिय सुविधा:- दर 15 दिवसांनी ताडोबा व्याघ्र प्रकल्प चंद्रपुर येथील पशुवैद्यकिय अधिकारी यांचेकडून सेवा पुरविण्यासाठी व्यवस्था केलेली आहे. ताडोबा येथील पशु वैद्यकिय अधिकारी व्यस्त असल्यास शासकिय कॅम्प येथील हत्तींची नियमित तपासणी करण्यासाठी नजीकचे पशुधन विकास अधिकारी (LDO) अहेरी आणि जिमलगट्टा यांना वेळोवेळी पाचारण केले जाते.माहे नोव्हेबर/2022 मध्ये WRTC, गोरेवाडा-नागपुर प्रकल्पातील पशुवैद्यकिय चमु यांना बोलावून त्यांचेकडून हॅत्ती कॅम्प मधील सर्व हत्तीची तपासणी (Herd Screening) केली गेलेली आहे. तसेच पुन्हा 02 मार्च 2023 ला WRTC, गोरेवाडा-नागपुर चमुने तपासणी केलेली

आहे.यापुढे दर महिण्याच्या पहिल्या आठवड्यात WRTC,गोरेवाडा-नागपुर चमु कमलापुर येथे तपासणीसाठी येईल याबाबत व्यवस्था केली गेलेली आहे.हत्तीचे वैद्यकिय तपासणी साठी सिरोंचा वनविभागाची संपुर्ण यंत्रणा दक्ष असते व तात्काळ वैद्यकिय उपचार दिले जातात.यात कोणतीही हयगय केली गेलेली नाही.

सदर कॅम्प मध्ये कायम स्वरुपी अनुभवी पशु वैद्यकिय अधिकाऱ्याची गरज आहे,त्याबाबत मागणी केली गेली आहे. वैद्यकिय शासनाकडून नेमणूक होईपर्यंत वरिल घटनेच्या पार्श्वभुमीवर या अगोदर नमुद वैद्यकिय सुविधेबरोबरच कंत्राटी तत्वावर पशु अधिकारी नेमण्याची प्रक्रिया केली जात आहे.तसेच संपूर्ण व्यवस्थापन अद्ययावत,वैद्यकिय सुविधा, देखभाल साठी सहाय्यक वनसंरक्षक स्तरावर समिती गठीत(वपअ,महावत व पशुवैद्यकिय अधिकारी हे सदस्य)केलेली आहे.त्यांच्या अहवालानुसार सुधारणा करण्याबाबत प्रस्ताव तयार करुन कार्यवाही केली जाईल.कमलापुर हत्ती कॅम्प हा गडचिरोली जिल्हयाच्या दृष्टीने अतिशय प्रसिध्द पर्यटन स्थळ आहे याची जाणीव वनविभागाला आहे. वनविभागासाठी ही अभिमानाची बाब आहे.हत्तींच्या देखभाली मध्ये कोणतीच हयगय वनविभागाच्या स्तरावर झालेली नाही व सर्व वैद्यकिय सुविधा वेळेवर पुरविल्या जात आहे असे उप वनसंरक्षक सिरोंचा वनविभाग,सिरोचा,पूनम पाटे,यांनी कळविले आहे.