भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

 

भंडारा दि. 2: अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील ज्या विद्यार्थ्यांना शासकीय वसतिगृहात प्रवेश मिळालेला नाही. अशा विद्यार्थ्यांना मॅट्रिकोत्तर शिक्षण घेता यावे म्हणून भोजन, निवास, शैक्षणिक साहित्य, निर्वाह भत्ता आदि आवश्यक सुविधा विद्यार्थ्यांना स्वत: उपलब्ध करुन घेण्यासाठी आवश्यक ती रक्कम संबंधित विद्यार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये थेट उपलब्ध करुन देण्यासाठी शासनाने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना सुरु केलेली आहे. शासन निर्णय दि. 13 जून 2018 च्या सुधारीत तरतुदीनुसार विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ देण्यात येतो.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांना 11 वी, 12 वी तसेच इयत्ता 12 वी नंतरच्या व्यावसायिक तसेच बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमामध्ये मूळ जिल्ह्याच्या ठिकाणी असलेल्या 5 किंमी. अंतरावर असलेल्या विविध स्तरातील महाविद्यालयात/ शिक्षण संस्थामध्ये प्रवेश घेतलेला असावा. या योजनेचा लाभ घेण्यासाठी इयत्ता 10 वी/ 12 वी/ पदवी/ पदविका परीक्षेमध्ये 50 टक्के गुण असणे अनिवार्य आहे. या योजनेमध्ये दिव्यांग (अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील) विद्यार्थ्यांना 3 टक्के आरक्षण असेल. दिव्यांग (अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील) विद्यार्थ्यांसाठी गुणवत्तेची टक्केवारी 40 टक्के इतकी राहील.

अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील ज्या विद्यार्थ्यांना शासकीय वसतिगृहात प्रवेश मिळालेला नाही अशा पात्र लाभार्थ्यांनी सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी लवकरात लवकर संबंधित जिल्ह्याचे सहाय्य आयुक्त, समाज कल्याण कार्यालयाकडे अर्ज सादर करावे असे आवाहन डॉ. सिद्धार्थ गायकवाड प्रादेशिक उपायुक्त, समाज कल्याण विभाग नागपूर हे करीत आहे.