chandrapur I ‘सर्वांची साथ… तर कोरोनावर मात…’ – जिल्हाधिकारी अजय गुल्हाने

‘सर्वांची साथ… तर कोरोनावर मात…’ – जिल्हाधिकारी अजय गुल्हाने

‘माझे कार्यक्षेत्र, माझी जबाबदारी’ अंतर्गत भद्रावती व वरोरा येथे संवाद कार्यक्रम

Ø ‘मास्क’ हा कपडे परिधानाचाच एक भाग व्हावा

Ø दंड करण्यापेक्षा मानसिकतेत बदल हवा

Ø कोरोना तपासणी व लसीकरण वाढविण्यावर भर

चंद्रपूर दि. 8 मार्च : मागील दोन आठवड्यापुर्वी एक अंकी येणारी नवीन कोरोना बाधीतांची संख्या आता 80 च्या आसपास असून नुकतेच दोन वेळा 120 च्या वर देखील गेली आहे. नागपूर, अमरावती व इतर जवळच्या जिल्ह्यात नवीन बांधीतांची संख्या हजारच्या संख्येने आढळून येत आहे. ही धोक्याची घंटा ऐकून नागरिकांनी कोरोनाला गांर्भीयाने घेणे गरजेचे आहे. नागरिकांना मास्कचा वापर, सुरक्षीत अंतराचे पालन व वारंवार हात धुणे या कोरोना त्रिसुत्री नियमांचे पालन करण्यास उद्युक्त करण्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधी व अधिकारी यांचा सहभाग महत्वाचा आहे, त्यामुळे आता कोरोनाविरूद्धच्या लढ्यात ‘सर्वांची साथ मिळाली तर कोरोनावर सहज मात करता येईल’, असे मत जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी आज व्यक्त केले.

‘माझे कार्यक्षेत्र, माझी जबाबदारी’ या उपक्रमांतर्गत जिल्हाधिकारी अजय गुल्हाने व मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले यांनी उपविभागीय अधिकारी सुभाष शिंदे यांचेसह आज भद्रावती येथील स्थानिक मंगल कार्यालयात व वरोरा येथील नगरपरिषदेच्या सभागृत विभागातील लोकप्रतिनिधी व शासकीय अधिकारी यांचेशी संवाद साधला. यावेळी भद्रावती येथील नगराध्यक्ष अनिल धानोरकर, जिल्हा परिषद सदस्य प्रवीण सुर व अर्चना जीवतोडे, तसेच वरोरा येथे नगराध्यक्ष अहतेशामअली, बांधकाम सभापती राजू गायकवाड, पंचायत समिती सभापती श्री. धोपटे, उपसभापती संजीवणी भोयर, उपविभागीय पोलीस अधिकारी निलेश पांडे, पोलीस निरीक्षक सुनिल पवार, यांचेसह तहसिलदार प्रशांत बेडसे, तहसिलदार मंगेश शिंदोळे, गट विकास अधिकारी मंगेश आरेवार, तालुक्यातील जिल्हा परिषदेचे सदस्य, पंचायत समिती सदस्य, सर्व सरपंच, नगरसेवक तसेच तालुका आरोग्य अधिकारी व सर्व संबंधीत शासकीय अधिकारी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी गुल्हाने पुढे म्हणाले की ज्याप्रमाणे आपण रोज कपडे, बुटं घालतो त्याचप्रमाणे आता मास्कचा वापर हा देखील आपल्या परिधानाचाच एक भाग करावा, याबाबतचे समुपदेशन नागरिकांमध्ये जनप्रतिनिधींद्वारे आवश्यक आहे. जिल्हा प्रशासन देखील कोरोना प्रतिबंधासाठी तपासणी, लसीकरण व जनजागृती या तीन बाबींवर भर देत आहे. सुपरस्प्रेडरच्या कोरोना तपासणी आवश्यक असल्याचे सांगून कोरोना तपासणीमुळे लवकर निदान झाल्यास संभाव्य धोका टाळता येईल, तसेच कोरोनाचा फैलावदेखील रोखता येईल. लसीकरणासाठी यापुर्वी 20 शासकीय व 7 खाजगी केंद्र कार्यरत होते. त्यात आजपासून 13 शासकीय केंद्र सुरू करण्यात आले असून पुढील दोन दिवसात सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रात लसीकरण सुरू करण्यात येणार आहे त्यामुळे लसीकरण केंद्राची संख्या 60 ते 70 पर्यंत जाईल असेही जिल्हाधिकारी यांनी सांगितले. ज्येष्ठ नागरिक व व्याधीग्रस्त नागरिकांना लसीकरण केंद्रावर उन्हाचा किंवा पाण्याचा त्रास होऊ नये याकडे संबंधीतांनी लक्ष देण्याचे निर्देशही जिल्हाधिकारी यांनी यावेळी दिले. नियम न पाळणाऱ्या नागरिकांना केवळ दंड करून भागणार नाही तर मास्कचा वापर करण्याची मानसिकता त्यांच्या तयार करण्यावर भर देण्याकडेही त्यांनी यंत्रणेचे लक्ष वेधले.

मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले यांनी मध्यंतरी कोरोना बांधीताची संख्या कमी झाल्याने नागरिकांमध्ये गाफीलपणा वाढल्याचे सांगितले. कोरोना प्रतिबंधासाठी लसीकरण वाढविण्यात येत आहे पण तोपर्यत लोकप्रतिनिधींनी नागरिकांना कोरोना त्रिसुत्री नियम पाळण्याचे आवाहन करावे, असे त्यांनी सांगितले. कोव्हीड-19 च्या दुसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेता आपआपल्या क्षेत्रातील सर्व नागरीकांना स्वत:हून कोविडची तपासणी करुन घेणे, कोविड रुग्णांच्या संपर्कात आलेल्या सर्व व्यक्तींची माहिती देणे त्यासोबतच मास्कचा वापर, सामाजिक अंतर राखणे, वारंवार हात धुणे, गर्दीच्या ठिकाणी जाण्याचे टाळणे, लग्न व इतर सामुहिक समारंभाच्या ठिकाणी नियंत्रित संख्या ठेवणे, कोरोनासंदर्भातील लक्षणे आढळताच त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेणे आदीबाबत स्थानिक लोकप्रतिनिधीं, अधिकारी यांनी आपल्या कार्यक्षेत्रातील नागरिक व कर्मचाऱ्यांना उद्युक्त करण्याचे आवाहन कर्डिले यांनी केले.

कार्यक्रमाला नगर परीषद, तहसिल व इतर कार्यालयाचे कर्मचारी व व्यावसायीक उपस्थित होते.