जी20 परिषदेच्या पार्श्वभूमिवर शासकीय विज्ञान महाविद्यालयात वाय 20 उपक्रम

जी20 परिषदेच्या पार्श्वभूमिवर शासकीय विज्ञान महाविद्यालयात वाय 20 उपक्रम

5 मार्च रोजी जनजागृतीपर विविध कार्यक्रमांचे आयोजन

गडचिरोली, दि.27 : यावर्षी जी 20 शिखर परिषदेचे भारत देशाकडे यजमानपद आहे. याचाच एक भाग म्हणून देशातील युवकांना त्यांचे मत मांडणे व चर्चा करण्याच्या उद्देशाने वाय20 उपक्रमाचे आयोजन युवा कार्यक्रम व खेळ मंत्रालय, भारत सरकार आणि महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यातील प्रत्येक जिल्हयातील एका महाविद्यालयात करण्यात आले आहे. गडचिरोली जिल्हयातील शासकीय विज्ञान महाविद्यालयाची निवड संचालक उच्च शिक्षण, महाराष्ट्र राज्य व सहसंचालक नागपूर यांनी केली आहे. या कार्यक्रमाचे आयोजन रविवार दिनांक 5 मार्च रोजी दुपारी 12.00 वाजता चामोर्शी रोडवरील शासकीय विज्ञान महाविद्यालयात करण्यात आले आहे. यादिवशी जनजागृतीपर वकृत्व स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, पोस्टर स्पर्धा व निबंध स्पर्धांचे आयोजन केले आहे.

वाय 20 कार्यक्रमाचे उद्घाटन दुपारी 12.00 वा होणार असून लोकशाही आणि प्रशासनातील तरुणांचा सहभाग या विषयावरील वक्तृत्व स्पर्धेला 1.00 वा सुरूवात होणार आहे. दुपारी 2.00 वा नवकल्पना आणि 21 व्या शतकातील कौशल्ये या विषयावरील निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानंतर 3.00 वा. पोस्टर सादरीकरण व त्याच दिवशी सकाळी 9.00 वा रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. पोस्टर व रांगोळी स्पर्धेसाठी विषय एकच आहेत. यात उद्योग 4.0, नवकल्पना आणि 21 व्या शतकातील कौशल्ये, शांतता-निर्माण आणि सलोखा, हवामान बदल आणि आपत्ती जोखीम कमी करणे, आरोग्य, कल्याण आणि खेळ हे विषय आहेत. Youth 20 (Y20) हे सर्व G20 सदस्य देशांतील तरुणांसाठी एकमेकांशी संवाद साधण्यासाठी एक अधिकृत सल्लामंच आहे. Y20 भविष्यातील नेते म्हणून तरुणांना जागतिक समस्यांबद्दल जागरुकता वाढवण्यासाठी, विचारांची देवाणघेवाण करण्यासाठी, वाद घालण्यासाठी, वाटाघाटी करण्यासाठी आणि सहमती मिळवण्यासाठी प्रोत्साहित करते.