जीवती तालुक्यात ब्लॉसम उपक्रमांतर्गत नागरिकांची आरोग्य तपासणी

जीवती तालुक्यात ब्लॉसम उपक्रमांतर्गत नागरिकांची आरोग्य तपासणी

 

चंद्रपूर, दि. 09 : महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिकच्या वतीने नागपूर विभागातील आदिवासीबहुल 18 गावांमध्ये गावातील नागरीकांची आरोग्य तपासणी करण्याचा उपक्रम राबवल्या जात आहे. त्यामध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील जीवती तालुक्यातील धनकदेवी व नोकेवाडा या दोन गावांचा समावेश आहे. दि. 8 फेब्रुवारी रोजी नोकेवाडा गावामध्ये आरोग्य शिबीर पार पडले.

 

या शिबिरामध्ये गावातील पुरुष, महिला व बालकांची प्राथमिक आरोग्य तपासणी करण्यात आली. नागरीकांची नोंदणी करून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, चंद्रपूर येथील तज्ञामार्फत रक्तदाब, मधुमेह आदी रोगाबाबत तसेच कर्करोग, कुपोषण अस्थीं आजार, एचआयव्ही, सिकलसेल, यकृताचे आजार व रक्ताची तपासणी करण्यात आली.

 

याप्रसंगी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय चंद्रपूर येथील बालरोग तज्ञ डॉ. फलके, शस्त्रक्रिया तज्ञ डॉ. कारमोरे, स्त्रीरोग तज्ञ डॉ. मांगे, तसेच विमलादेवी आयुर्वेदिक महाविद्यालय व बागला होमिओपॅथिक कॉलेज, चंद्रपूर येथील प्रशिक्षणार्थी उपस्थित होते.

 

जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.गहलोत यांच्या मार्गदर्शनात कोरपना व जीवती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. स्वप्निल टेंभे, वैद्यकीय अधिकारी डॉ.गजेंद्र अहिरकर, आशा समूह संघटक राजेश भगत, श्री. ठमके, श्री. बरडे श्रीमती आंबटकर यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले. आशासेविका यांच्या माध्यमातून प्रत्येक कुटुंबाचे फॅमिली फोल्डर भरून कुटुंबनिहाय तपासणी करण्यात आली. नोकेवाडा येथील नागरीकांनी आरोग्य शिबिराचा लाभ घेतला.