महाराष्ट्र लोकसेवा आयोग सन 2022 मध्ये आयोजित स्पर्धा परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक जाहीर

महाराष्ट्र लोकसेवा आयोग सन 2022 मध्ये आयोजित स्पर्धा परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक जाहीर

चंद्रपूर दि. 11 फेब्रुवारी : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत सन 2022 मध्ये आयोजित करण्यात येणाऱ्या विविध स्पर्धा परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक आयोगाकडून निश्चित करण्यात आले असून सदर वेळापत्रक आयोगाच्या www.mpsc.gov.in या संकेतस्थळावर (वेबसाईटवर) प्रसिध्द करण्यात आले आहे.

शासनामध्ये मागणीनुसार शासन सेवेतील विविध पदांवरील भरती करिता आयोगामार्फत वर्षभर विविध परीक्षांचे आयोजन करण्यात येते. त्यानुसार सन-2022 मध्ये घेण्यात येणाऱ्या विविध परीक्षांचे दिनांक निश्चित करण्यात आले आहेत. प्रस्तावित परीक्षेचे वेळापत्रक निश्चित करताना संघ लोकसेवा आयोग, विविध विद्यापीठे, परीक्षा घेणाऱ्या इतर संस्था इत्यादिंकडून आयोजित करण्यात येणाऱ्या परीक्षांचे वेळापत्रक विचारात घेऊन आयोगाच्या परीक्षांचे वेळापत्रक निश्चित करण्यात येते. जेणेकरुन, आयोगाच्या व संबंधित संस्थांच्या परीक्षा एकाच दिवशी येणार नाही व उमेदवारांचे नुकसान होणार नाही. यासंदर्भात विधीमंडळातही अनेकवेळा चर्चा झाली असून त्यावेळी विधीमंडळात देण्यात आलेल्या आश्वासनानुसार कोणत्याही परीक्षा एकाच दिवशी येणार नाहीत, याची दक्षता घेणे गरजेचे आहे. त्यानुसार सर्व संबंधित संस्थांना प्रस्तावित वेळापत्रकाची प्रत पाठवून यासंदर्भात दक्षता घेण्याची विनंती करण्यात आली आहे.

असे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे सह सचिव सुनिल अवताडे यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.