chandrapur I सावली तालुक्यात प्रतिदिवशी 10 हजार मजुरांना रोजगाराचे नियोजन.

सावली तालुक्यात प्रतिदिवशी 10 हजार मजुरांना रोजगाराचे नियोजन
तालुका आढावा बैठकीत पालकमंत्री वडेट्टीवार यांचे प्रतिपादन
 24 तास पाणीपुरवठासाठी एक्सप्रेस फीडर
 कर्मचारी वसाहतीसाठी निधी मंजूर
 सावली पर्यटनाच्या नकाशावर आणण्याचे नियोजन

चंद्रपूर, दि. 23 फेब्रुवारी : सावली तालुक्यात रोजगार हमी योजनेच्या कामावर माहे मार्चपासून प्रतिदिवशी 10 हजार मजुरांना रोजगार उपलब्ध करून देण्याचे नियोजन करण्यात आले असल्याची माहिती पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी काल दिली.
सावली तालुक्यातील विकास कामांचा आढावा काल पालकमंत्री वडेट्टीवार यांनी सिंचई विश्रामगृह, सावली येथे घेतला. यावेळी तहसिलदार परिक्षीत पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक कुमारसिंग राठोड, नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी मनिषा वजाडे, वन अधिकारी वसंत कांबळे, विस्तार अधिकारी अनिरूद्ध वाडके, सार्वजनिक बांधकाम विभागाचे सहाय्यक अभिंयता सुधीर राऊत, विलास चांदेकर, मनसुखलाल बोंगले इ. प्रामुख्याने उपस्थित होते.
सावली येथे दररोज 24 तास पाणीपुरवठा उपलब्ध करून देण्यासाठी अखंडीत विद्युत उपलब्ध व्हावी म्हणून एक्सप्रेस फीडर बसविण्याकरिता दोन कोटी रुपये मंजूर करण्यात आले असल्यचे पालकमंत्री वडेट्टीवार यांनी सांगितले. तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाची प्रशासकीय इमारत व आरोग्य विभाग, भूमी अभिलेख, पीडब्यु् डी च्या कर्मचाऱ्यांकरिता निवासस्थान बांधकामासाठी 13.5 कोटी रुपये व पोलीस कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानाकरिता 5.5 कोटी रुपये मंजूर करण्यात आले असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. सावली येथे स्पर्धा परिक्षेच्या अभ्यासाकरिता ई-लायब्ररी देखील सुरू करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
सावली तालुका पर्यटनाच्या नकाशावर आणण्यासाठी असोलामेंढा येथे पर्यटन केंद्र विकसीत करण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला असून सर्व सुविधायुक्त 50 कॉटेज, हॉल, बोटींग सुविधा, आयफेल टॉवर, लाल किल्ला, ताजमहल असे सात जागतिक आश्चर्याच्या फायबर प्रतिकृती येथे बसविण्यात येणार असल्याचे पालकमंत्री यांनी सांगितले. यातुन किमान 500 स्थानिक नागरिकांना रोजगार उपलब्ध होईल असेही त्यांनी सांगितले.
कोरोनाचा आढावा घेतांना सावली तालुक्यात कोरोना तपासण्या वाढविण्याचे निर्देश त्यांनी आरोग्य यंत्रणेला दिले. तसेच नागरिकांना नियमित मास्क वापरण्यासाठी उद्युक्त करण्याचे व मास्क न वापरणाऱ्या गैरजबाबदर नागरिकांवर कडक दंडात्मक कार्यवाही करण्याचे त्यांनी सांगितले असता मास्क न वापरणे व कोरोनाचे नियम न पाळणाऱ्या नागरिकांकडून मागील चार दिवसात 27 हजार रुपये दंड वसूल केला असल्याची माहिती तहसिलदार परिक्षीत पाटील यांनी दिली. यावेळी पालकमंत्री वडेट्टीवार यांनी सार्वजनिक बांधकाम, सिंचन, नगरपरिषद, वन विभाग, आरोग्य विभागासह विविध विभागाचा आढावा घेतला. बैठकीला संबंधीत अधिकारी उपस्थित होते.