कुष्ठरोग निवारण पंधरवडा अंतर्गत चंद्रपूरात ‘रन फॉर लेप्रसी’

कुष्ठरोग निवारण पंधरवडा अंतर्गत चंद्रपूरात ‘रन फॉर लेप्रसी’

चंद्रपूर, दि. 30 : स्पर्श – 2023 कुष्ठरोग जनजागृती अभियान तसेच 30 जानेवारी ते 13 फेब्रुवारी 2023 या कालावधीत कुष्ठरोग निवारण पंधरवडा राबविण्यात येणार आहे. या अंतर्गत महात्मा गांधी पुण्यतिथीनिमित्त सहाय्यक संचालक (कुष्ठरोग) चंद्रपूर, महानगर पालिका आरोग्य विभाग व ॲथलेटिक्स असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवारी ‘रन फॉर लेप्रसी मॅरेथॉन’ (पुरुष / महिला गट) चे आयोजन करण्यात आले.

 

समाजातील लोकांमध्ये कुष्ठरोगाबाबत असलेले गैरसमज, अंधश्रध्दा, भीती दूर करून हा आजार इतर आजारांप्रमाणे सारखाच आहे, ही भावना लोकांच्या मनात रुजविणे, हा या मॅरेथॉनचा उद्देश आहे. मॅरेथॉनची सुरवात महानगर पालिका, गांधी चौक येथून करण्यात आली. उद्घाटनप्रसंगी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. बंडू रामटेके, महानगर पालिकेच्या उपायुक्त विद्या पाटील, सहाय्यक संचालक (कुष्ठरोग) डॉ. संदीप गेडाम, मनपाच्या मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. वनिता गर्गेलवार, ॲथलेटिक्स असोसिएशनचे अध्यक्ष श्री. आडेपवार आदी उपस्थित होते.

‘रन फॉर लेप्रसी’ मॅरेथॉन गांधी चौक, जटपूरा गेट, प्रियदर्शनी चौक, वरोरा नाका, जनता कॉलेज चौक आणि परत गांधी चौकात मॅरेथॉनची सांगता झाली. कार्यक्रमाचे संचालन डॉ. जनबंधू यांनी तर आभार श्री. त्रिपुरवार यांनी मानले. यावेळी महानगर पालिका क्षेत्रातील नागरी आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी व कुष्ठरोग कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते.