10 फेब्रुवारी पासून हत्तीरोग दुरीकरण औषधोपचार मोहिम   

10 फेब्रुवारी पासून हत्तीरोग दुरीकरण औषधोपचार मोहिम   

 

गडचिरोली, दि.24: राष्ट्रीय किटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत हत्तीरोग दुरीकरणासाठी सार्वत्रिक औषधोपचार मोहिम (एमडीए/आयडीए) ही दिनांक 10 फेब्रुवारी 2023 ते 20 फेब्रुवारी 2023 या कालावधीमध्ये राबविणेबाबत केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सुचना प्राप्त झालेले आहे. त्या अनुषंगाने गडचिरोली जिल्हयात चामोर्शी व आरमोरी या तालुक्यात सदर मोहिम राबविण्यात येणार आहे. यासाठी जिल्हाधिकारी, संजय मीणा यांचे मार्गदर्शनात हत्तरोग दुरीकरण औषधोपचार (एमडीए/आयडीए) मोहिम जिल्हा समन्वय समिती सभा जिल्हाधिकारी कार्यालय येथे दिनांक 23 जानेवारी 2023 रोजी घेण्यात आली.

या सभेस मुख्य कार्यपालन अधिकारी,कुमार आशीर्वाद, जिल्हयातील सर्व विभाग प्रमुख तसेच सहाय्यक संचालक, आरोग्य सेवा (हिवताप), नागपूर डॉ.श्याम निमगडे, जागतिक आरोग्य संघटना, सल्लागार नागपूर, विभाग, डॉ.भाग्यश्री त्रिवेदी, तसेच आरोग्य विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

हत्तीरोग हा क्युलेक्स डासापासून होणारा संक्रमक आजार असून, हा आजार हत्तीरोग (फायलेरीया) या नावाने ओळखला जातो. क्युलेक्स डासाची उत्पत्ती घाण पाण्यात , गटारे, सांडपाणी यामध्ये मोठया प्रमाणात होते. दुषित डास मनुष्याला चावतो व त्वचेवर हत्तीरोगाचे जंतू सोडतो हे जंतू त्वचेतून शरिरात प्रवेश करतात व लसिकाग्रंथी मध्ये स्थिरावतात. जंतूचा शरीरातील प्रवेश आणि आजाराची लक्षणे दिसण्याचा कालावधी हा 8 ते 16 महिन्यांचा असतो. सदर कालावधित रक्ताची तपासणी केली नाही व औषधोपचार केला नाही तर शरीरात जंतूची वाढ होवून हाता पायावर सुज येणे व अंडवृध्दी होणे इत्यादी लक्षणे दिसून येतात. हत्तीरोगाचे जंतू हे मानवी रक्तात मोठया प्रमाणात दिसून येतात त्यामुळे रात्री 8 ते 12 वा.च्या दरम्यान रक्तनमुना घेऊन तपासणी केल्यानंतर हत्तीरोगाचे निदान करता येते.

हत्तीरोग हा गडचिरोली जिल्हयातील गंभीर आरोग्य समस्या आहे या रोगामुळे शारीरीक विकृती, अंपगत्व असे गंभीर परिणाम होतात. यासाठी शासनाने हत्तीरोग दुरीकरण मोहिमेतंर्गत तीन औंषधाची (आयडीए) उंची व वयोगटानूसार एक मात्रा घेऊन या रोगाचा समुळ नाश करता येतो. हत्तीरोगाचे तीनही औषधी प्रत्येक घरात आरोग्य कर्मचाऱ्याद्वारे मोफत देण्यात येतील ही औषधी रिकाम्या पोटी घेऊ नये तसेच अलबेंन्डाझोल ही गोळी चावून चावून खावी. औषधी देणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांसमोरच गोळया खाणे आवश्यक आहे. 2 वर्षापेक्षा कमी वयाची मुले व गरोदर माता तसेच गंभीर रुग्णांना ही औषधी दिली जाणार नाही.

सार्वत्रिक औषधोपचार मोहिम प्रभावीपणे राबविण्यासाठी तसेच हत्तीरोग दुरीकरणासाठी सार्वत्रिक औषधोपचार मोहिमेत लोकसहभाग वाढविण्या संदर्भात जिल्हाधिकारी, संजय मीणा यांनी आरोग्य विभागाला सुचना दिल्या.