भंडारा || टॅब वाटपाबाबतच्या अपप्रचाराला विद्यार्थ्यांनी बळी पडू नये महाज्योतीचे आवाहन

भंडारा || टॅब वाटपाबाबतच्या अपप्रचाराला विद्यार्थ्यांनी बळी पडू नये महाज्योतीचे आवाहन

 

भंडारा दि.19 : JEE/NEET/MHT-CET चे प्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मोफत टॅब वाटप करण्याची महत्वाकांक्षी योजना महाज्योती मार्फत राबविण्यात येते. महाज्योतीकडे नोंदणीकृत विद्यार्थ्यांना टॅब वाटप करण्याचे कार्य महाज्योतीने हाती घेतलेले असून वाटपाच्या कामास गती देण्यात आलेली आहे. आजपर्यंत सन 2023 च्या प्रशिक्षणासाठी नोंदणी झालेल्या धुळे, नंदुरबार, लातूर, उस्मानाबाद या जिल्हयातील विद्यार्थ्यांना टॅब वाटप करण्यात आलेले आहे. तसेच वर्धा जिल्ह्यात सन 2023 व 2024 च्या प्रशिक्षणासाठी नोंदणी झालेल्या वर्धा जिल्हयातील विद्यार्थ्यांना टॅबचे वाटप करण्यात आले आहे.

 

पुणे, सोलापूर, औरंगाबाद, बीड, जालना, उस्मानाबाद, परभणी, लातूर, हिंगोली, नांदेड सहित इतर उर्वरीत सर्व जिल्हयात JEENEET/MHT-CET चे प्रशिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांना मोफत टॅब वाटप करण्याकरीता संबंधित जिल्हयांचे समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त यांना नियुक्त करण्यात आले आहे. तसेच वाटपाची प्रक्रीया सुरळीत पार पाडावी यासाठी लेखी मार्गदर्शक सुचना देखील देण्यात आल्या आहेत.

 

विधानपरिषदेची शिक्षक व पदवीधर मतदार संघाकरिता निवडणूकीची आदर्श आचारसंहिता लागू असल्याने दिनांक 4 फेब्रुवारी 2023 नंतर उर्वरित विद्यार्थ्यांना त्यांच्या जिल्हयाच्या ठिकाणी टॅब वाटप करण्यात येणार आहे. टॅब वाटपाचा दिनांक व वेळ महाज्योती कार्यालयामार्फत नोंदणीकृत विद्यार्थ्यांना त्यांच्या संपर्क क्रमांकावर कळविण्यात येणार आहे.

 

महाज्योतीने संबंधित जिल्हयातील सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण यांचे मार्फत टॅब वाटपाचे नियोजन पूर्ण केलेले असून नोंदणीकृत प्रत्येक विद्यार्थ्याला टॅब व मिळेल याची दक्षता घेतलेली आहे. त्यामुळे टॅब वाटपाबाबत पसरविल्या जाणाऱ्या अपप्रचाराला विद्यार्थी व पालक यांनी बळी पडू नये असे आवाहन महाज्योती मार्फत करण्यात येत आहे.