पाईप वगळता जलजीवन मिशनसाठी लागणारे किरकोळ साहित्य इतर कोणत्याही दुकानातून घेण्यास मुभा

पाईप वगळता जलजीवन मिशनसाठी लागणारे

किरकोळ साहित्य इतर कोणत्याही दुकानातून घेण्यास मुभा

 

चंद्रपूर, दि. 16 : जलजीवन मिशन अंतर्गत नळ पाणीपुरवठा योजनांच्या बांधकामाकरीता लागणारे किरकोळ साहित्य इतर कोणत्याही दुकानातून खरेदी करण्यास मुभा आहे. परंतू, सदर कामाकरीता लागणारे पाईप हे महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांच्याकडून मान्यताप्राप्त कंपनीचेच घेणे आवश्यक आहे. तशा सूचना देण्यात आल्याचे जि.प. ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता श्री. बोहरे यांनी कळविले आहे.

 

जलजीवन मिशन अंतर्गत ग्रामीण पाणीपुरवठा विभागामार्फत नळ पाणीपुरवठा योजनांची निविदा प्रक्रिया राबविण्यात येत आहे. तसेच सदर निविदा प्रक्रियेत सहभाग घेतलेल्या व निविदा प्रक्रियेत पात्र झालेल्या एल-1 निविदाधारकास आर्थिक लिफाफा उघडल्यानंतर कार्यारंभ आदेश देण्याच्या कार्यवाहीकरीता लागणारे सुरक्षा ठेव रकमेचा धनाकर्ष व स्टॅम्प पेपर सादर करण्याबाबत कार्यालयाकडून वारंवार भ्रमणध्वनीद्वारे व मौखिकरीत्या सूचना देण्यात आली आहे. तरीसुध्दा निविदा धारकाकडून कागदपत्रासंबंधी विलंब होत असल्यामुळे कार्यारंभ आदेश निर्गमित करण्यास विलंब होत आहे.

 

आजपर्यंत 50 निविदाधारकांकडून कागदपत्रे प्राप्त व्हायची असल्याने त्याचे कार्यारंभ आदेश निर्गमित करणे शिल्लक आहे. त्या सर्व निविदा धारकांकडून दोन दिवसात कागदपत्रे प्राप्त करून कार्यारंभ आदेश निर्गमित करण्याची कार्यवाही पूर्ण करण्यात येईल, असेही जिल्हा परिषद ग्रामीण पाणी पुरवठा विभागाने कळविले आहे.