चंद्रपूर | जिल्हास्तरीय चाचा नेहरू बाल महोत्सवाचे उद्घाटन

चंद्रपूर | जिल्हास्तरीय चाचा नेहरू बाल महोत्सवाचे उद्घाटन

 

चंद्रपूर, दि. 11 : महिला व बालविकास विभागाच्या वतीने 10 ते 12 जानेवारी या कालावधीत रामबाग फॉरेस्ट कॉलनी, चंद्रपूर येथे जिल्हास्तरीय चाचा नेहरू बाल महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाचे उद्घाटन चंद्रपूर महानगर पालिकेचे आयुक्त विपीन पालीवाल यांच्या हस्ते करण्यात आले.

 

प्रमुख अतिथी म्हणून बाल कल्याण समितीच्या अध्यक्षा क्षमा बासरकर, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी दीपक बानाईत, जि.प.उपमुख्य कार्यकारी अधिकारी (महिला व बालकल्याण) संग्राम शिंदे, बाल विकास प्रकल्प अधिकारी रमेश टेटे आदी उपस्थित होते.

 

जिल्ह्यातील काळजी व संरक्षणाची गरज असणारी मुले, विधी संघर्षग्रस्त मुले, कोविडमुळे प्रभावित झालेली मुले आणि शाळेत जाणारी इतर सामान्य मुले अशी एकूण 650 मुले या बाल महोत्सवात सहभागी झाली आहेत. यावेळी श्री. पालीवाल म्हणाले, कठोर मेहनत केल्याशिवाय यश मिळत नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांनी मेहनत करावी. तसेच मोबाईलवर गेम खेळण्यापेक्षा मैदानी खेळातून आपल्यातील प्रतिभा सिद्ध करावी.

 

कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी दीपक बानाईत यांनी केले. बाल महोत्सव 10 ते 12 जानेवारी असे तीन दिवस चालणार असून यात कबड्डी, खो खो यासारखे मैदानी खेळ तसेच वैयक्तिक व सांस्कृतिक स्पर्धा यांचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी बाल संरक्षण अधिकारी अजय साखरकर तसेच बाल संरक्षण कक्षाच्या संरक्षण अधिका-यांनी सहकार्य केले.