पवनी व साकोली रुग्णालयातील रेडिओलॉजिस्ट ची रिक्त पदे प्राधान्याने भरावीत जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर

रुग्णवाहिका खरेदीचा प्रस्ताव सादर करावा

पवनी व साकोली रुग्णालयातील रेडिओलॉजिस्ट ची रिक्त पदे प्राधान्याने भरावीत जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर

 

भंडारा दि 7:जिल्ह्यातील शासकीय आरोग्य यंत्रणा बळकट करण्यासाठी आवश्यक ते मनुष्यबळ ,औषध सामग्री, तांत्रिक सहाय्य, रुग्णालय स्वच्छता, आधार ॲट बर्थची अंमलबजावणी, यासह पवनी व साकोली या रुग्णालयातील रेडिओलॉजीस्टची रिक्त पदे भरण्यासंबंधी जिल्हा शल्य चिकित्सक व जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी तातडीने कार्यवाही करावी तसेच वरिष्ठांना याबाबत पत्र व्यवहार करून त्याचा पाठपुरावा करावा, असे निर्देश जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी आज दिले. जिल्हा रुग्णालयाला त्यांनी आज भेट देवुन पाहणी केली. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. दीपचंद सोयाम, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मिलिंद सोमकुंवर यांच्यासह आरोग्य यंत्रणेचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

 

रुग्णालयातील विविध कक्षांची पाहणी केल्यानंतर आढावा बैठक घेण्यात आली. या आढावा बैठकीमध्ये प्रामुख्याने राष्ट्रीय आरोग्य मिशन मधील गैरहजर असणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांवर जबाबदारी निश्चित करण्यात यावी व त्यांनी कर्तव्यात कसूर केल्याची लक्षात येत असल्यास त्यांची वेतन कपात करण्यात यावी असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.

 

शासकीय रुग्णालयात येणाऱ्या गरीब व गरजू रुग्णांना वाजवी दरात आरोग्य सुविधा देण्यात याव्यात .यासाठी शासकीय रुग्णालय येणाऱ्या रुग्णांची संपूर्णपणे ऑनलाईन नोंदणी करण्यात यावी तसेच नोंदणी ठिकाणी रुग्णांना बसण्यासाठी खुर्च्यांची देखील व्यवस्था करण्यात यावी. रुग्णालयातील सर्व विभागातील इलेक्ट्रिक फिटिंग तपासून आवश्यकतेनुसार दुरुस्त करून घेण्यासाठी विद्युत अभियंत स्वतः पाहणी करून तसा अहवाल द्यावा,असे श्री .कुंभेजकर यांनी सांगितले.

 

सामान्य नागरिकांना आरोग्य सुविधा देणे हे शासनाचे मूलभूत कर्तव्य असून यादृष्टीने जिल्हा सामान्य रुग्णालयात असणाऱ्या आरोग्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या बाबींचे अवलोकन व त्यावर सविस्तर चर्चा जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी संबंधित अधिकाऱ्यांशी केली. त्यामध्ये प्रामुख्याने औषध विभागाचे गोडाऊन व्यवस्थित करणे ,नवजात बालकांचे आधार काढल्यानंतर तात्काळ त्यांना तिथेच त्याची प्रिंट उपलब्ध करून देणे, प्रत्येक इमारतीवरील टॅंक मधील पाणी वाया जात असल्यामुळे प्रत्येक टॅंकवर सेंसर लावण्यात यावे व त्या ठिकाणी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्याचे निर्देश श्री .कुंभेजकर यांनी दिले. जुन्या रुग्णालयातील उद्वाहन (लिफ्ट) दुरुस्त करणे व नवीन इमारतीमधील लिफ्ट लवकर सुरू करण्याचे निर्देश त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंत्यांना दिले.

 

जिल्ह्यात वाढती रुग्णसंख्या पाहता रुग्णवाहिका खरेदीचा प्रस्ताव खनिकर्म निधीतून सादर करता येईल का याची चाचपणी करून तशा पद्धतीने तो प्रस्ताव सादर करावा. बालकांच्या श्रवणदोष मशीन खरेदीबाबतचा प्रस्ताव जिल्हा शल्य चिकित्सकांनी विहित वेळ सादर करावा. मॉड्युलर ऑपरेशन थिएटर वरील भागातील नवीन शेड तयार करणे बाबत देखील प्रस्ताव द्यावा.

 

या जिल्हा सामान्य रुग्णालयाचे कामकाज ऑनलाइन पद्धतीने व्हावे व त्यासाठी आवश्यक ते मनुष्यबळ व ऑपरेटरची नियुक्ती करण्याबाबत देखील प्रस्ताव सादर करण्यात येण्याचे निर्देश जिल्हाधिकारी श्री. कुंभेजकर यांनी दिले. रुग्णालयातील ब्लड बँकतून गरजूंना वेळेत रक्तपुरवठा उपलब्ध करून देण्यात यावा . बालकांच्या अतिदक्षता कक्षाचे फायर ऑडिट वेळेत करून घ्यावे यासाठी अग्निशमन विभागाचे ना हरकत प्रमाणपत्र घेण्यात यावे. तसेच त्या विभागातील रिक्त पदे भरण्यासाठी पाठपुरावा करण्यात यावा, असे निर्देश त्यांनी यावेळी दिले.

 

जिल्हा सामान्य रुग्णालयाला दिलेल्या भेटीत जिल्हाधिकारी श्री.कुंभेजकर सामान्य रुग्णालयातील प्रत्येक इमारतीला व त्यातील प्रत्येक कार्यरत कक्षाला भेट दिली व त्या भेटीत तिथे कार्यरत अधिकारी कर्मचाऱ्यांकडून त्या कक्षाच्या कामाचे स्वरूप देखील समजून घेतले.